Monday, May 5, 2025

क्रीडाIPL 2025

विक्रमी धावसंख्येसह लखनऊचा विजय

विक्रमी धावसंख्येसह लखनऊचा विजय

पंजाबचा ५६ धावांनी धुव्वा

मोहाली (वृत्तसंस्था) : मार्कस स्टॉयनिस आणि काइल मेयर्स यांच्या वादळी खेळीसह आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी मोठे फटके लगावत लखनऊला यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची २५७ ही सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यानंतर अर्थात दबावाखाली सुरुवातीलाच विकेट गमावल्याने पंजाबचा संघ २०१ धावांवर सर्वबाद झाला. लखनऊने हा सामना ५६ धावांनी जिंकत हंगामातील पाचवा विजय मिळवला. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्सचे सलामीवीर मोठ्या लक्ष्याच्या दबावाखाली पटकन बाद झाले. कर्णधार शिखर धवन अवघी एक धाव करून तंबूत परतला. तर प्रभसिमरन सिंगने आपल्या खात्यात ९ धावांची भर टाकली. त्यानंतर अथर्व तायडे आणि सिकंदर रझा यांनी षटकार, चौकारांची बरसात करत पंजाबला झटपट धावा मिळवून दिल्या. तायडेने ६६, तर सिकंदर रझाने ३६ धावा जोडल्या. त्यानंतर इतर फलंदाजांनी फटकेबाजी करत थोड्या फार धावा जोडल्या. परंतु त्या विजयासाठी अपुऱ्या ठरल्या. पंजाबचा संघ १९.५ षटकांत २०१ धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे लखनऊच्या ९ गोलंदाजांनी या सामन्यात गोलंदाजी केली. यश ठाकूरने ४, तर नवीन उल हकने ३ विकेट मिळवल्या.

फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने निर्धारित २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात २५७ धावांचा डोंगर उभारला. मार्कस स्टॉयनिस आणि काइल मेयर्स यांची वादळी खेळी विशेष ठरली. मार्कस स्टॉयनिसने ७२ धावा, काइल मेयर्सने ५४ धावा, आयुष बदोनीने ४३ धावा, तर निकोलस पूरनने ४५ धावांचे योगदान दिले. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तर आयपीएलमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये आरसीबीची सर्वोच्च २६३ धावसंख्या आहेत. २०१३ मध्ये आरसीबीने हा धावांचा डोंगर उभारला होता. लखनऊचा संघ याबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सलामी फलंदाज काइल मेयर्सने वादळी खेळी केली. पहिल्या चेंडूपासूनच मेयर्स याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने १८०च्या स्ट्राईक रेटने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. स्टॉयनिसने ४० चेंडूंत ७२ धावांचे योगदान दिले. लखनऊने १८व्या षटकात १९ धावा चोपल्या. पंजाबच्या गोलंदाजांनी शुक्रवारी खराब कामगिरी केली. राहुल चहरचा अपवाद वगळता पंजाबच्या गोलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही.

Comments
Add Comment