महाड (प्रतिनिधी) : महाड तालुक्यातील तळीये कोंढाळकर वाडीमधील दरडग्रस्त नागरिकांची दि. २२ जुलै २०२१ रोजी झालेली परवड चालू वर्षीही सुरूच राहण्याची भीती व्यक्त होत असून, चालू पावसाळ्यापूर्वी नवीन घरात जाण्याचे नागरिकांचे स्वप्न अपुरेच राहणार का?, अशी विचारणा या गावातील नागरिकांकडून केली जात असून, सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाची गती पाहता ठेकेदाराने अधिक गतीने कामे करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून शासनाकडे केली जात आहे.
२२ व २३ जुलै २०२१ मध्ये झालेल्या नैसर्गिकरीत्या दरड कोसळण्याच्या आपत्तीमध्ये महाड तालुक्याच्या वरंध विभागातील तळीये कोंढाळकर वाडीमधील ८४ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तत्कालीन शासनाने या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन घटनास्थळी भेट देऊन संबंधित सर्व ग्रामस्थांना शासनामार्फत नवीन घरे देण्याची घोषणा केली होती. शासनाच्या म्हाडा यंत्रणेमार्फत ही घरे बांधण्यात येण्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, महाडच्या प्रांत कार्यालयातून तळीये येथील नागरिकांच्या पुनर्वसन सद्यस्थितीबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, एकूण २६३ नागरिकांना या ठिकाणी नवीन घरांची निर्मिती केली जाणार असून, या तुलनेत पूर्ण झालेल्या घरांची संख्या १४ असून, स्ट्रक्चरल उभारून झालेली घरे ३७ आहेत़ २५ घरांच्या भिंती उभारण्यात आल्या असून, १६ घरांची प्लंबिंगची कामे पूर्ण झाली आहेत, तर सहा घरांची लाईट फिटिंग झाली असून, सध्या सुरू असलेली सात घरांची कामे पाहता एकूण १३ घरांची लाईट फिटिंग काही दिवसांमध्ये पूर्ण होतील. टाइल्स बसून झालेल्या घरांची संख्या १५ असून, ११ घरांचे पेंटिंगचे काम पूर्ण झाले आहे. १४६ घरांसाठी खड्डे पाडण्यात आले असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतर्गत खोल्यांचे काम स्लॅबपर्यंत पूर्ण झाले आहे. अंगणवाडीचे कलर काम सुरू असून, फरशी काम बाकी आहे. ग्रामपंचायत इमारतीच्या बाहेरील बाजूचे प्लास्टर काम सुरू असून, स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले आहे. व्यायामशाळा, समाज मंदिर स्लॅब पूर्ण झाला असून, प्लास्टर काम बाकी आहे. पाणी टाकीचे चार मजले बांधून पूर्ण झाले असून, पूर्ण स्लॅबची तयारी सुरू आहे. दहा व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू असून, बस स्टॉपचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्ते पूर्णत्वाकडे असून, शेवटच्या टप्प्यातील कामे सद्यस्थितीत सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकूणच मागील दोन वर्षांपूर्वीच्या या दुर्दैवी घटनेच्या आठवणी विसरण्याच्या नागरिकांच्या मानसिकतेला लवकरात लवकर नवीन घरात गृहप्रवेशासाठी शासकीय यंत्रणेने कामे केल्यास नागरिकांची असलेली दुःखे आगामी काळात कमी होतील, अशी आशा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे़
यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांकडे केलेल्या चौकशीनुसार, म्हाडा या गृहनिर्माण करणाऱ्या यंत्रणेने नेमलेल्या ठेकेदाराकडून संथगतीने कामे सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत महाडचे आमदार भरत गोगावले यांनी नुकतीच महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या समवेत बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वी तळीये दरडग्रस्त नागरिकांच्या गृहप्रवेशाबाबत तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या यंत्रणेअंतर्गत सुरू असलेल्या अन्य कामांबाबतही सविस्तर चर्चा करून कामांना अधिक गतीने करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.