तीन हात नाका ते ठाणे स्थानक मार्ग एकदिशा होणार!

  223

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला असून दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने तीन हात नाका ते ठाणे स्थानकापर्यंतचा मार्ग एक दिशा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे ठाणेकरांचे वेळापत्रक आणखी बिघडणार असून पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल १५ मिनिटे खर्च होणार असल्याने स्थानिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.



यापूर्वीही वाहतूक विभागाने हा प्रयोग केला होता. तो फसल्यानंतर पुन्हा या एकदिशा मार्गाचा हट्ट धरण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. ठाणे शहरात विशेषत: कोपरी आणि नौपाड्यामध्ये सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक विभागाने पुन्हा एक दिशा मार्गाचे हत्यार उपसले. त्यानुसार तीनहात नाका, एलबीएस रोड ते हरिनिवास सर्कल येथून ठाणे स्थानकापर्यंतच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.



वाहतूक विभागाने केलेल्या नियोजनानुसार तीनहात नाका येथून स्थानक दिशेने जाणारी वाहने हरिनिवास सर्कल येथून उजवीकडे वळून छत्रपती संभाजी महाराज पथ, पुढे डावीकडे वळून सरळ शेगाव कचोरी ते सत्यम कलेक्शनच्या दिशेने जातील. तेथून पुढे प्रजापिता ब्रम्हकुमारी चौकापासून उजवीकडे वळून कलाकेंद्रपर्यंत एकदिशा जातील.



पुढे याच मार्गावरून उजवीकडे वळून गोखले रोडने पुढे टेलीफोन नाका ते मल्हार सिनेमाच्या दिशेने तीनहात नाक्यापर्यंत वळतील. तीनहात नाका येथून मल्हार रोडने पुढे गोखले रोडने स्टेशनकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हरिनिवास सर्कल येथून टेलीफोन नाका डावीकडे वळून गोखले रोडने स्थानकाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा एकदिशा मार्ग तीनहात नाका ते रेल्वेस्थानक परिसरापर्यंत जाणाऱ्यांसाठी सोयीचा ठरणार असला तरी, हरिनिवास सर्कल परिसरातील तसेच या दिशेने येणाऱ्या नागरिकांना मात्र तापदायक ठरणार आहे. कारण सर्कल ते तीनहात नाका हे अंतर अवघ्या पाच मिनिटांचे आहे. या एकदिशा मार्गामुळे नागरिकांना वळसा घालून पुढील प्रवास करावा लागणार आहे.


स्थानिकांचा या निर्णयाला कडाडून विरोध; यावेळीही मोर्चा काढू!
यासंदर्भात हरकती व सूचना घेण्यासाठी वाहतूक विभागाने बोलावलेल्या २४ एप्रिलच्या बैठकीमध्येही हाच सूर उमटला. अनेक नागरिकांनी या एकदिशा मार्गाला यावेळी विरोध केला. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी हाच प्रयोग करण्यात आला होता. तो अशस्वी झाल्यानंतरही पुन्हा तोच अट्टाहास का ? असा सवाल माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी केला. त्यापेक्षा येथील अनधिकृत पार्किंग, रिक्षांचे अनधिकृत थांबे आणि फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा, म्हणजे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले.



नागरिकांच्या मागण्या मान्य न करता जबरदस्तीने एकेरी वाहतूक बदल लादला तर मागच्यावेळी जसा मोर्चा काढला, तसा यावेळीदेखील काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या बैठकीला माजी नगरसेवक संजय वाघुले, राजेश मढवी, व्यापारी प्रतिनिधी हितेश शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक क्षत्रिय आणि राजहंस, परम सुख, उत्तुंग सोसायटी आदी पदाधिकारीही उपस्थित होते. या एकदिशा मार्गामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याने आठवड्याभरात ही व्यवस्था सुरू केली जाणार आहे. त्यापूर्वी नागरिकांच्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण केल्या जातील, असे वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.


Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या