मालवण तालुका बुथ कार्यकर्ता मेळाव्यात साधला संवाद
आगामी सर्व निवडणुकीत १०० टक्के विजय हेच लक्ष्य
मालवण (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजप देशाला महासत्ता बनवेल. देशाला सुरक्षित बनवेल, असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण कुंभारमाठ येथे बोलताना व्यक्त केला.
भाजपच्या नेतृत्वात भारताची गतिमान प्रगती होत आहे. भाजप हा जगातील मोठा पक्ष आहे. या पक्षाच्या सर्व उमेदवारांना आगामी सर्व निवडणुकीत बहुमताने विजय करणे हा धर्म प्रत्येकाने पाळावा, असे आवाहनही यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
भाजप मालवण तालुका बुथ कार्यकर्ता मेळावा कुंभारमाठ येथील अथर्व सभागृहात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शन उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते. यावेळी बुथ अध्यक्ष प्रभारी यांच्याकडून आढावा घेत मंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मालवण वासीयांबद्दल माझ्या मनात आदर आहे. प्रेम आहे. १९९० साली कोणतीही ओळख नसताना मला विजयी करून विधानसभेत पाठवले. त्याच बळावर मी राज्यात व देशातील अनेक पदे भूषवली हे मी विसरू शकत नाहीत. राज्य असो केंद्र असो जनतेसाठी जे मागू ते मिळते. जिल्ह्यात रस्ते, वीज, पाणी, रोजगार या प्राथमिक सुविधा दिल्या. मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज आणले. आता जिल्ह्यात इंडस्ट्री पार्क आडाळी येथे येते. जिल्ह्यात उद्योजक व्हावेत यासाठी एमएसएमइ मार्फत प्रशिक्षण सुरू. यापुढे रोजगार निर्मिती करणारे उद्योजक अधिकाधिक स्वरूपात जिल्ह्यातून घडवणे यासाठी प्राधान्य असणार आहे, असेही नारायण राणे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाला अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणले. आता तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. विविध प्रकल्प माध्यमातून गतिमान विकास सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचेही दरडोई उत्पन्न वाढत आहे. आणखी वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले.
जी २० देश प्रमुखपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले. जागतिक कीर्तीचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्या देशाला लाभले. हा आपला अभिमान आहे. त्यांचे हात अधिक बळकट करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, धर्म आहे. २०२४ ला ४०० प्लस लोकसभा विजयाचे लक्ष आहे. आणि ते मिळणारच. असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्यावरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला. देशाच्या विकासात यांचे योगदान काय? विकास करणे यांच्या आमदारांना खासदारांना शक्य नाही. केवळ जनतेची दिशाभूल करणे हेच या पक्षांचे काम आहे. ठाकरे गटाला आता स्वतःचे अस्तित्व नाही, असाही टोला मंत्री नारायण राणे यांनी लगावला.
मला भाजपने मोठे केले मी भाजपला मोठे करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणार ही भावना प्रत्येक कार्यकर्त्यांची असली पाहिजे. त्यासाठी १०० टक्के योगदानातून काम करा. आगामी सर्व निवडणुकीत १०० टक्के विजय हेच लक्ष प्रत्येकाचे असले पाहिजे. बुथ सक्षम करा. असेही मंत्री नारायण राणे म्हणाले.
भाजपचा विजय हाच निर्धार : भाजप प्रदेश सचिव निलेश राणे
आपली स्पर्धा वैभव नाईक किंवा कुठलाही पक्षाशी नाहीच. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय हाच निर्धार आहे. १०० टक्के यश कोणीच रोखू शकत नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजयाचा निर्धार करा. तीनही आमदार आणि खासदार आपलाच असला पाहिजे, असे भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व मालवण तालुक्यतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कामाचे निलेश राणे यांनी कौतुक केले. मालवण तालुक्यात ज्या वेगाने काम चालू आहे त्याच वेगाने ठेवूया. २०१४ च्या निवडणुकीत ज्यांनी राणे साहेबाना पाडले त्याला पाडल्या शिवाय गप्प बसणार नाही. असेही निलेश राणे यांनी सांगितले.