Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीआप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बनावट पत्राचा सूत्रधार कोण?

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बनावट पत्राचा सूत्रधार कोण?

अलिबाग (प्रतिनिधी) : डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बनावट सहीचे फेक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमात काही श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अधिकृतरित्या १७ एप्रिल २०२३ ला पत्र काढून ही घटना माझ्यासाठी क्लेषदायक असल्याचे आणि माझ्या कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे, तसेच माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच असल्याने याचे कोणी राजकारण करू नये असे या पत्रात म्हटले होते.

या पत्राला काही दिवस उलटत नाही तोच अनोळखी व्यक्तीने डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बनावट सहीचे पत्र शनिवारी सोशल मीडियावर टाकत त्या पत्रात ‘राज्य सरकारच्या गलिच्छ कारभारामुळे मला व माझ्या साधकांना त्रास झाला, मी पुरस्कार नको बोललो होतो, मला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला भाग पाडले. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला व त्यांचा जीव घेतला, माझ्या साधकांसाठी साधा मंडपही टाकला नाही. मी लवकरच पुरस्कार आणि राशी सरकारला परत करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.’’ या पत्राबाबत काही श्रीसदस्यांशी संपर्क साधला असता, सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. कोणीतरी गैरसमज पसरविण्याच्या उद्देशानेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बनावट सहीचे पत्र सोशल मीडियावर टाकले असावे, असेही श्रीसदस्यांचे म्हणणे आहे.

ज्या सन्मानाने महाराष्ट्र शासनाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला आहे, तो पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी परत कसा करू शकतात, तसेच भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असेही आप्पासाहेब धर्माधिकारी बोलूच शकत नाहीत असेही श्रीसदस्यांचे म्हणणे आहे. ज्यांनी हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून गैरसमज पसरविण्याचे काम केले आहे, त्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेऊन संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -