उद्धव ठाकरे यांना सत्तेचे व्यसन!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका


मुंबई : सत्तेची नशा कधी, कशी व कुणाला लागली हे उद्धव ठाकरे यांनी सांगूच नये. ते तमाम जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या व्यसनापायी उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले. ठाकरे यांच्याकरिता सत्ता हेच साध्य आहे. त्यांना सत्तेचे व्यसन जडले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.


त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर जनकल्याणाचे व अंत्योदयाचे साधन आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, तिन्ही पक्षाचा विचार महाराष्ट्राचा सत्यानाश करायचा आहे. मविआच्या सभामंध्ये एक नेता बोलताना इतर तीन लोक वेगळेच बोलतात, अर्धी गर्दी कार्यक्रम सोडून निघून जाते. काल नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना ५० टक्के लोक निघून गेले होते. तीन पक्ष आप-आपले लोक आणतात गर्दी जमवितात, गाड्या-घोड्या लावतात, लोक येतात एन्जॉय करतात आणि निघून जातात. जनतेला विकास हवा आहे. तोंडाच्या वाफा नाहीत.


भाजपाची विचारधारा महत्वाची!


अजित पवार हे भाजपात येणार अशी चर्चा आहे. हालचाली सुरु आहेत का, यावर बावनकुळे म्हणाले, याबाबत काहीच माहित नाही, त्यांच्या भूमिकेवर काहीच माहिती नाही. चर्चा खूप होत असतात, जर-तरला राजकीय जीवनात अर्थ नाही, त्यामुळे ज्या गोष्टीची चर्चा नाही. आमचा हा महिना प्रवेशाचा आहे. २५ लक्ष प्रवेश करुन घेणे हेच आमचे लक्ष्य आहे. बुथवर काम करणाऱ्यांचा प्रवेश सुरु आहे. पक्षामध्ये कोणीही आले तरी स्वागतच आहे. त्यांना भाजपची विचारधारा मान्य असेल, त्यांना यानुसार काम करायचे असेल तर स्वागत आहे.


मृत्यूचे कुणीही राजकारण करू नये


आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण कार्यक्रमावर विरोधकांना राजकारण करायचे आहे, कार्यक्रमात प्रकृती बिघडून मृत्यू झाला ही घटना दु:खद आहे. कुणामुळे काय झाले याला कोणताच अर्थ नाही. मृताना काय मदत करता येईल हे महत्वाचे आहे, असे सांगून त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.


विरोधकांत एकजुट होणार नाही


भाजपाच्या विविध राज्यातील सरकारांचे काम, डबल इंजिन सरकारांचे काम हे जनतेला पटल आहे. विरोधकांनी कितीही मोट बांधल्या तरी पंतप्रधान मोदीजी यांनी भारताला सर्वश्रेष्ठ करण्यापासून व लोकसभेत ४०० प्लस जागा जिंकण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही कामावर विश्वास ठेवणारे लोक आहोत तोंडाने वाफा फेकत नाही. विरोधकांत एकजुट होत नाही.


फडतूस कोण हे सिद्ध झाले!


उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथे फडतूस असा पुनरुच्चार केला. यावर बावनकुळे म्हणाले की, कुटुंब प्रमुख जेव्हा फडतूस असतो, तेव्हा घराचे वासे फिरतात. म्हणूनच ४० जिगरी सहकारी ठाकरेंना सोडून गेले. त्यावरून फडतूस कोण हे आपोआप सिद्ध होते. वारंवार स्वतः बद्दल ते बोलत आहेत. नागपूरच्या सभेत भाषण सुरु असताना खुर्च्या रिकाम्या होत्या. यातून त्यांचाच फडतूसपणा सिद्ध होतो.


राम मंदिराचा विषय सामोपचाराने मार्गी लावला


पंतप्रधान मोदी यांच्यावर ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे विसरले, आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, त्यांचे अनेक वर्षे तेव्हा केंद्रात सरकार होते. राम मंदिर हा विषय काँग्रेसने चिघळत ठेवला. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयीन व लोकशाहीच्या मार्गाने निकाली काढला. प्रभू श्रीराम हे राष्ट्रपुरुष आहेत. काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाने दोन धर्मांत तेढ निर्माण झाली. हे वास्तव उद्धव ठाकरे विसरतात का? मोदीजींनी सामोपचाराने हा विषय मार्गी लावला.


आ. देशमुख यांचा बोलविता धनी


आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या दर्जाहीन टीकेवर प्रतिक्रीया व्यक्त करताना ते म्हणाले, एका आमदाराने अशी टीका करणे योग्य नाही. त्यांचा बोलविता धनी कोण हे सर्वांना माहीत आहे. पुढच्या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातील जागरूक नागरिक या आमदारांचा "योग्य उपचार" करणार आहेत.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी