Sunday, June 22, 2025

सफाई कर्मचाऱ्यांच्या बदली आदेशातील दोन मयत, आठ सेवानिवृत्त कर्मचारी!

सफाई कर्मचाऱ्यांच्या बदली आदेशातील दोन मयत, आठ सेवानिवृत्त कर्मचारी!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार


कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. १७ मार्च रोजी महापालिका प्रशासनाने १५९ सफाई कामगारांच्या बदल्या केल्या. बदल्यांच्या यादीमध्ये दोन मयत, तर आठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचादेखील समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार नेहमीच उजेडात येत असतो. आता निमित्त आहे ते सफाई कामगारांच्या बदल्यांचे. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने १७ मार्च रोजी सफाई कामगारांच्या बदल्या केल्या. तब्बल १५९ कामगारांच्या बदल्यांची यादी तयार करण्यात आली. मात्र यादीतील दोन कामगार मयत, तर आठ कामगार हे सेवानिवृत्त झाल्याचे लक्षात आले. आपली चूक लक्षात येताच खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने तत्काळ यादी दुरुस्त केली व पुन्हा दुरुस्त केलेली यादी जाहीर केली. यादी पाठवणाऱ्या तसेच यादीवर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या नावांची शहानिशा का केली नाही? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Comments
Add Comment