- स्वयंसिद्धा : प्रियानी पाटील
मार्केटमध्ये खरेदी करताना घामाच्या धारांनी अक्षरश: कंटाळा आलेला म्हणून पावलं आपसूकच ज्यूस प्यावं म्हणून त्या दिशेने वळलेली. मात्र ज्यूस पिता पिताच लक्ष लागलं ते एका चेहऱ्याकडे जो क्षणभर ओळखीचा वाटून गेला. कित्येक दिवसांनी पाहतोय आपण हिला असं वाटून गेलं. नमू…! तिला पटकन हाक मारली, पण तिने अनोळखी असल्यागत मान वळवली आणि ती तिथून निघालीही. तिने ओळख दाखवली नसली तरी ती नमूच होती याची पूर्ण खात्री पटलेली. वाटलं तिच्या मागोमाग जाऊन तिला ओळख न दाखवण्याचं कारण विचारावं, पण तोवर ती निर्विकार चेहऱ्याने तिथून निघूनही गेली.
ही अशी कशी बदलली? आणि किती दिवसांनी, महिन्यांनी नव्हे तर वर्षांनी भेटूनही तिने ओळख नाही दाखवली. याचं आश्चर्य वाटून राहिलं. खरं तर अर्ध्यावरच शाळा सोडून ती घरी राहिली होती आणि त्यानंतर बरीच वर्षं कुठे दिसलीच नव्हती ती अशी आज अचानक समोर आली.
नमूचं हे वागणं जरा खटकलंच. ती अशी का वागली याचं उत्तर नव्हतं. पण या गोष्टीची खंत एका मैत्रिणीसमोर मांडलीच. श्वेताला फोन केला, म्हटलं, ‘अगं आज नमू दिसली मार्केटमध्ये. तिला हाकही मारली, पण तिने ओळखच नाही दाखवली.’
तशी श्वेता एकदम किंचाळलीच. ‘नमू? नमू दिसली तुला? अगं काय वेडी झालीस का?
’
‘का, काय झालं? अगं खरंच मला नमू दिसली. तिला मी हाकही मारली. पण तिने अनोळखी असल्यागत भासवलं आणि ती तिथून निघूनही गेली.’
‘अगं नमू कशी दिसेल तुला?’ श्वेताचा आवाज कातरलेला.
‘का? का नाही दिसणार? एखादी व्यक्ती काही वर्षांनंतर आपल्याला दिसू शकत नाही का?’
‘दिसू शकते गं, पण नमू या जगात नाही.’ श्वेता धीरगंभीरपणे म्हणाली.
तिचं हे बोलणं ऐकून तर काळजात धस्स झालं. ‘नमू या जगात नाही? कसं शक्य आहे? मी तर तिला प्रत्यक्ष पाहिली आणि ती नमूच होती.’
‘अगं ती शाळा सोडल्यानंतर मामाकडे राहायला गेली होती, तिथेच तिचा अपघात झाला आणि ती गेली. घरी तिची आई एकटीच असते.’ श्वेताच्या बोलण्यावर मन अधिक बैचेन झालं.
नमू गेल्याची बातमी तशी कधी कानावरही आली नव्हती. मग श्वेताचा फोन झाल्यावर आणखी दोघा-तिघांना फोन केले. पण तिथूनही नमू या जगात नसल्याचंच कळलं. पण मग आपल्याला भेटली ती कोण होती?
एका चेहऱ्यासारखी आणखीही माणसं असू शकतात, पण सेम नमूसारखीच व्यक्ती आपणास भेटावी आणि नमू या जगात नसल्याचं वृत्त कानी यावं यासारखी वाईट गोष्ट नाही.
पण तिची आई, ती आता वृद्ध झाली असेल. तिला तरी भेटून यावं असं ठरवलेलं. नमू नजरेसमोरून जाता जाईना. वाटलं उद्या पुन्हा त्या ज्यूसच्या दुकानापाशी थांबावं. नमूसारखी दिसणारी ‘ती’ पुन्हा तिथे आली तर तिला भेटता येईल, पुन्हा खात्री करता येईल म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये उगाच रेंगाळलेले. पण ‘ती’ तिथे आलीच नाही. म्हणून मग मन अस्वस्थ झालं.
आता मात्र पावलं थेट तिच्या आईच्या घराकडे वळलेली. तिच्या आईला भेटावं, तिचं सांत्वन करावं. म्हणून थोडं मनाला सावरून पावलांचा वेग वाढलेला. काही तासांतच तिच्या घरी पोहोचले नि कसलाही विचार न करता थेट तिच्या आईला भेटले. नमूचा विषय निघताच, तिच्या आईच्या पापणीच्या कडा ओलावल्या. पदराने डोळे पुसत म्हणाली, ‘नमूची आज आठवण आली का?’
‘नमू गेल्याचं मला माहीतच नव्हतं तर… पण काकू नमू मला दिसली हो, काल मार्केटमध्ये… पण तिने ओळख नाही दाखवली. म्हणून श्वेताला फोन केला तर ‘नमू या जगात नाही’ असं कळलं.’ तशी नमूची आई भांबावली. म्हणाली, ‘नमू दिसली तुला? कुठे दिसली? कुठे दिसली?’ तिने अधीर होऊन विचारलं.
‘मार्केटमध्ये.’
‘काय?’ तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
‘काकू तुम्ही रडू नका. हे बघा तसं काही नाही. एका चेहऱ्यासारखी दिसणारी दुसरी व्यक्ती असू शकते.’
‘मला भेटवशील का गं तिला?’ काकू रडवेली होऊन म्हणाली.
‘माहीत नाही, पण काकू ती नमू नाही. तुम्ही स्वत:ला सावरा आणि ती व्यक्ती कोण, कुठे राहते मला नाही ठाऊक. ती लगेच निघूनही गेली त्यावेळी. मलाही नाही माहीत कुठे गेली ती.’ काकूंना समजावण्याच्या प्रयत्नात बोलले, पण काकू माझं बोलणं थांबवत म्हणाल्या, ‘पण मला ठाऊक आहे ना, ती कुठे राहते ती… मी देते त्या पत्त्यावर मला घेऊन चलशील का?’
‘म्हणजे?’ मी संभ्रमात…
‘म्हणजे नमू जिवंत आहे गं. नमू या जगातून गेली असं मीच सगळ्यांना खोटं सांगितलं होतं. तिला मामाकडे पाठवली, तिथे तिचा अपघात झाला असं नातेवाइकांना सांगितलं. उगाच घराला कलंक नको म्हणून…! कारण नमूने ज्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट केला, तो ना जातीतला होता ना धर्मातला. नातेवाइकांना काय सांगावं? पोरीचा हट्ट होता म्हणून मीच तिला त्या मुलासोबत लग्न करण्यास परवानगी दिली. पण, पोरगी या जगातून कायमची गेली हे सांगून मी मात्र कायमची वेळ मारून नेली.’ काकू बोलत राहिली. म्हणाली, ‘नमूचा मृत्यू झाला हे काही ठरावीक लोकांनाच माहीत होतं. ती कुठे राहते हे मला माहीत आहे, पण आजवर इतक्या वर्षात तिची माझी भेट नाही.’ तिच्या आईचं बोलणं ऐकून पायाखालची जमीनच सरकली. हे भयाण वास्तव या मातेने आजवर कसं पचवलं? डोळे क्षणभर पाणावले यापेक्षा नमू जिवंत आहे याचा जास्त आनंद वाटला.
तिच्या आईने डोळे पुसले. म्हणाली, ‘माझी नमू जगासाठी मेली असली तरी ती जिवंत आहे. जगाच्या भीतीने मी नमूचं अस्तित्वं संपवलं, मी अपराधी आहे. मला घेऊन चल तिच्याकडे’ आई
ओक्साबोक्शी रडली.
आता आईने जगाच्या भीतीने घेतलेल्या या निर्णयाचा क्षणभर राग येऊन गेला काहीसा. पण, तिने जे केलं ते मुलीच्या भविष्यासाठी केलं, हे जाणून तिला साथ देण्याचं ठरवलं आणि आईच्या मायेपोटी कशाचाही विलंब न करता लगेचच नमूच्या घरी जाण्यासाठी आमची पावलं वळली देखील.