Sunday, June 22, 2025

निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेऊन आरोपी साहिलच्या लग्नात हजर

निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेऊन आरोपी साहिलच्या लग्नात हजर

नवी दिल्ली: निक्की यादव हत्याकांडात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात लिव्ह-इनची चर्चा चुकीची ठरली आहे. साहिल गेहलोत आणि निक्की यादव यांनी मंदिरात लग्न केल्याचे तपासात समोर आले आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तो म्हणजे साहिलच्या वडिलांना या हत्येची माहिती होती. त्या व्यतिरिक्त पाच आरोपींनी सुनियोजित कट रचून निकीचा खून केला. तिचा मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे हाही त्याचाच एक भाग होता. हत्येनंतर सर्व आरोपी साहिलच्या लग्नाला हजर होते.


याप्रकरणी विशेष पोलिस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव यांनी माहिती देताना सांगितले, दोघांनी २०२० मध्ये लग्न केले होते. हा विवाह मंदिरात पार पडला. मात्र त्यानंतर घरच्यांनी साहिलचे लग्न दुसऱ्याच मुलीसोबत निश्चित केल्याचे तपासात समोर आले आहे. साहिलने आपली फसवणूक करून पुन्हा लग्न करू नये, अशी विनंती निक्की करत होती.
जेव्हा साहिल निक्कीला समजवू शकला नाही तेव्हा तिच्या हत्येचा कट रचला गेला. यामध्ये इतरांचाही समावेश होता. त्यानंतर साहिलने कट अंमलात आणला. हत्येनंतर त्याने १० फेब्रुवारी रोजी इतर आरोपींना माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी लग्नाला हजेरी लावली.


या हत्येप्रकरणी पोलिसांनी साहिल गेहलोतचे वडील वीरेंद्र सिंह, दोन भाऊ आशिष आणि नवीन यांच्यासह साहिलचे दोन मित्र अमर आणि लोकेश यांना अटक केली आहे. नवीन हा दिल्ली पोलिसात हवालदार आहे. साहिल आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे.

Comments
Add Comment