मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मोदींवर झालेल्या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबतीला ‘गोल्डन गँग’ होती आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे याच ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते, अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडली आहे अशा शब्दांत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटलंय, ‘‘तपास यंत्रणा यांना आता विंचू, मगरी सारख्या वाटतात, पण २५ वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केलात त्याचे काय? कुठल्या गोल्डन गँग विषयी इशारे करताय? याकुब, नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय. पंतप्रधान बोलले त्याची एवढी सुपारी लागली?"
शेलार पुढे लिहितात, होय! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितले, ‘एक अकेला कितनों पर भारी है…!’ हे शब्द काही जणांसाठी “धौतीयोग”सारखे लागलेत. ज्यांना ही “मात्रा” लागू पडली त्यांना मळमळ, जळजळ होणारच ! आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरिच “ऍसिडिटी” फ्लश झालेय! होऊ दे एकदम साफ!!