
श्री गजानन महाराजांचा महिमा वाढू लागला तसे वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक भक्त महाराजांच्या दर्शनार्थ शेगावी येऊ लागले. जशी काही रोज शेगावात यात्रा भरावी. पूर्वी एका लेखात आपण पाहिले की, श्री महाराजांना उपाधी मुळीच आवडत नसे आणि अवडंबर तर नाहीच नाही. त्यामुळे महाराज बरेचदा इकडे तिकडे निघून जात. कधी जंगलात जाऊन बसत. तर महिना महिना तिकडेच राहत असत. एकदा श्री महाराज पिंपळगाव येथे पोहोचले. त्या पिंपळगावच्या परिसरात एक महादेवाचे पुरातन हेमाडपंती मंदिर होते. त्या मंदिरात येऊन महाराज मंदिराच्या गर्भगृहात पद्मासन लावून बसले. त्या गावाची गुराखी पोरे भविक असल्याने गायी चरवित असताना त्या मंदिरात नित्य येत.त्या दिवशी ती मुले मंदिरात आली असता त्यांना मंदिरात बसलेले महाराज दिसले. श्री महाराज समाधी अवस्थेत होते. त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल नव्हती. त्या मुलांना प्रश्न पडला की हे कोण? कारण या पूर्वी सायंकाळी ह्या मंदिरात कोणी सहसा जात-येत नसते. त्यापैकी काही मुलांनी ओढ्याचे जल आणून श्री महाराजांच्या पायावर अर्पण केले. तर कोणी फुलांची माळ करून समर्थांचे गळ्यात घातली. कोणी आपल्या शिदोरीमधील भाकरी महाराजांना अर्पण करण्याकरता महाराजांच्या मुखाजवळ धरली. पण हा साधू काही हालेना, बोलेना हे पाहून मुलांना विस्मय वाटला. शेवटी त्यांनी असा विचार केला की बराच उशीर झाला आहे. गावात लोक वाट पाहत असतील. तान्ही वासरे देखील भुकेली झाली असतील, तरी जावून गावातील ज्येष्ठ मंडळींना याबद्दल सांगू. गावात गेल्यावर हा प्रकार गावातील लोकांना कळला. दुसरे दिवशी प्रात:काली गावातील मंडळी मंदिरात आली. त्यांना देखील महाराज समाधी अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यांनी श्री महाराजांना पालखीत घालून वाजत- गाजत-मिरवत गावात आणले आणि मारुतीरायांच्या मंदिरात आणून बसविले. या प्रसंगाचे वर्णन दासगणू महाराजांनी इतके सुंदर केले आहे की ह्या पालखीमध्ये जणू आपण स्वतः हजर आहोत असे वाटते.
ऐसी भवती न भवती झाली l
एक पालखी आणविली l
त्यात उचलून ठेविली l
समर्थांची मूर्ती पाहा ll ४३ ll
ग्रामातील नारी नर l
अवघे होते बरोबर l
पुढे वाजंत्र्यांचा गजर l
होत होता विबुध हो ll ४४ ll
मधून मधून तुळशी फुले l
पौर टाकीत होते भले l
समर्थांचे अंग झाले l
गुलालाने लालीलाल ll ४५ ll
घण्ट्या घड्याळे वाजती l
लोक अवघे भजन करिती l
जय जय योगिराज मूर्ती l
ऐसे उंच स्वराने ll ४६ ll
मिरवणूक आली गावात l
मारुतीच्या मंदिरात l
बसविले आणून सद्गुरू नाथ l
एका भव्य पाटावरी ll ४७ ll
लोक नमस्कार करीत होते. पण महाराज समाधीतच होते. साधू हालत- बोलत नाहीत हे पाहून गावातील लोकांनी विचार केला की, आपण उपाशी बसून यांच्यापुढे स्तवन करावे. हा त्यांचा हेतू जाणून भक्तवत्सल श्री महाराज देहावर आले. हा सर्व प्रसंग अध्याय क्रमांक पाचमध्ये ओवी क्रमांक १० पासून ते ओवी क्रमांक ५२ या भागामध्ये संत कवी श्री दासगणू महाराज ह्यांनी सुंदर शब्दांत उभा केला आहे. श्री महाराज समाधी अवस्थेमधून देहावर आले त्याचे वर्णन पुढील ओव्यांमधून आले आहे.
तोही दिवस तसाच गेला l
मग लोकांनी विचार केला l
आपण करू स्तवनाला l
उपाशी बसून यांच्यापुढे ll ४८ ll
ऐसा जो ते विचार करिती l
तो आले देहावरती l
श्री गजानन सद्गुरू मूर्ती l
मुकुटमणी योग्यांचे ll४९ ll
मग काय विचारता l
आनंद झाला समस्ता l
प्रत्येक स्त्री-पुरुष ठेवी माथा l
स्वामींचीया चरणांवरी ll ५० ll
नैवेद्याची धूम झाली l
ज्याने त्याने आणिली l
पात्रे ती वाढून भली l
मारुतीच्या मंदिरात ll ५१ ll
त्या अवघ्यांचा स्वीकार l
समर्थे केला थोडा फार l
हालोपालित साचार l
ही वार्ता श्रूत झाली ll५२ ll
श्री महाराज पिंपळगावात कसे आले, पिंपळगावच्या जनांची भाविकता श्री महाराजांची मिरवणूक आणि पूजन याबाबतचा वृत्तान्त आपण पाहिला. या पुढील पिंपळ गावातील घटना पुढील लेख भागात पाहुयात.
-प्रा. प्रवीण पांडे, अकोला
[email protected]