Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीबेपत्ता सदिच्छा साने प्रकरणाचे गूढ उकलले!

बेपत्ता सदिच्छा साने प्रकरणाचे गूढ उकलले!

लाइफगार्डनेच खून करून मृतदेह समुद्रात फेकला

मुंबई : वर्षभरापूर्वी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या एमबीबीएसच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी सदिच्छा साने या तरुणीच्या मृत्यूचे गूढ अखेर १४ महिन्यांनी उकलले आहे. वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या पालघरच्या सदिच्छा साने हिचा खून झाला असून लाइफगार्ड म्हणून काम करणाऱ्या मिठ्ठू सिंग याने मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीत खुनाची कबुली दिली आहे. तसेच खून केल्यानंतर तिचा मृतदेह समुद्रात फेकून दिल्याचेही त्याने सांगितले.

मिठ्ठू सिंग हा सदिच्छाला भेटणारा शेवटचा व्यक्ती होता व त्याने तिच्यासोबत सेल्फी देखील काढली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. परंतु पोलिसांकडे ठोस पुरावे नसल्यामुळे त्याला अटक करता येत नव्हती. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर तो पोलिसांच्या विरोधात मानव अधिकाराची धमकी देत होता. अखेर गेल्या आठवड्यात मिठ्ठू सिंग आणि त्याचा आणखी एक साथीदार जब्बार या दोघांना मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९च्या पथकाने सदिच्छा साने प्रकरणात संशयावरून अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध अपहरण आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदिच्छा साने ही नोव्हेंबर २०२१ मध्ये बेपत्ता झाली होती. तिचे अपहरण झाले असावे असा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.५८ वाजता सदिच्छा विरार स्थानकातून लोकल ट्रेनमध्ये चढली होती. तिला दुपारी २ वाजता जे जे रुग्णालयात प्रिलिम परीक्षेला हजर राहायचं होतं. मात्र, ती अंधेरी स्थानकावर उतरली आणि तिथून दुसरी लोकल ट्रेन पकडून ती वांद्रे स्थानकावर उतरली. तिथून रिक्षा पकडून बँडस्टँडला पोहोचली. मोबाइलच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासानुसार ती दुपारपर्यंत त्याच परिसरात फिरत होती. तिथूनच ती नंतर बेपत्ता झाली होती.

मात्र मिठ्ठू सिंग याने पोलिसांना वेगळीच माहिती दिली होती. ‘त्या दिवशी माझी ड्युटी वांद्रे बँडस्टँडवर होती. सदिच्छा एकटी होती. ती समुद्राच्या दिशेने जात होती. ती आत्महत्या करेल की काय, असा संशय आल्याने मी तिच्या मागे गेलो. पण आत्महत्या करणार नसल्याचे तिने मला सांगितले. त्यानंतर आमच्यात चर्चा झाली. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत आम्ही बँडस्टँडमधील खडकावर बसून होते. तिथे सेल्फी घेतल्यानंतर दोघेही तेथून निघून गेलो, असे मिठ्ठू सिंगने सांगितले होते.

या प्रकरणी चौकशी सुरू असताना सदिच्छाच्या प्रकरणात गडबड असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांच्या चौकशीत तो उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या काही तांत्रिक पुराव्यावरून गुन्हे शाखेने त्याची उलट तपासणी सुरू केली असता या उलटतपासणीत तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याने सदिच्छा हिची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. मिठ्ठू सिंगच्या कबुलीनंतर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने हा खून का केला आणि खून करण्याआधी काही गैरकृत्य होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -