मद्यधुंद कारचालकाने स्वाती मालीवाल यांना फरपटत नेले
नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, एका मद्यधुंद कार चालकाने त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. स्वाती यांनी त्याला थांबवल्यानंतर त्याने त्यांना कारसह १५ मीटरपर्यंत फरपटत नेले. स्वाती मालीवाल गुरुवारी पहाटे रिअॅलिटी चेकसाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरल्या होत्या, तेव्हा ही घटना एम्स हॉस्पिटलजवळ घडली. स्वाती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
पहाटे ३.११ च्या सुमारास हरीशचंद्र नावाचा हा व्यक्ती त्याच्या बलेनो कारमधून त्यांच्याकडे आला आणि गाडीत बसण्याचा आग्रह करू लागला. स्वाती यांनी त्याला नकार दिल्याने त्याने गाडी पुढे नेली, पण नंतर यू टर्न घेऊन रस्त्याच्या कडेने चालवायला लागला.
त्या व्यक्तीने पुन्हा त्यांच्याशी गैरवर्तन केल्यावर त्या त्याला पकडण्यासाठी कारच्या खिडकीजवळ पोहोचल्या. त्यानंतर त्या व्यक्तीने कारची खिडकी बंद केली, त्यामुळे स्वाती यांचा हात त्यात अडकला. यानंतरही तो गाडी चालवत राहिला. कारचालकाने स्वाती यांना सुमारे १५ मीटरपर्यंत फरपटत नेले. इथून काही अंतरावर स्वाती यांची टीम त्यांची वाट पाहत होती. याचदरम्यान ही घटना घडली.
याआधी ३१ डिसेंबर २०२२च्या रात्री अंजलीला एका कारने दिल्लीत सुमारे १२ किलोमीटरपर्यंत ओढून नेले आणि मुलीचा मृत्यू झाला. स्वाती याप्रकरणी पुढे आल्या होत्या आणि त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.