Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीलातूरमध्ये एसटी पुलावरुन कोसळली

लातूरमध्ये एसटी पुलावरुन कोसळली

लातूर : लातूरमध्ये एसटी बस थेट पुलावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर, १४ जण गंभीर आहेत. जखमींवर मुरुड ग्रामीण रुग्णायात उपचार सुरू आहेत.

लातूरहून ही एसटी (MH 20 BL 2372) पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, ही बस मुरुडजवळ बोरगाव काळे येथे सकाळी आठच्या सुमारास आली असताना अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस थेट पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली. बसची समोरील बाजू मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. यामुळे आतील प्रवाशांना हादरा बसला. चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून बसमधील ४२ प्रवासी जखमी झाले. यातील १४ जण गंभीर जखमी आहेत.

अपघात होताच बोरगाव काळे शिवारातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एसटीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. याचवेळी शेतकऱ्यांनी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी झालेल्या १४ जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवासी मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. तसेच, बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -