मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पन्नासच्या दशकात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. मागील दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
आप्त आणि नातेवाईक असूनही चित्रा नवाथे यांनी आपला शेवटचा काळ वृद्धाश्रमात व्यतीत केला होता. चित्रा नवाथे यांची सख्खी बहीण रेखा कामत या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. लाखाची गोष्ट या चित्रपटात दोघी बहिणींनी एकत्र काम केले होते.
चित्रा नवाथे यांचे खरे नाव कुसुम सुखटणकर होते. प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा यांचा विवाह झाला होता. गदिमांनी त्यांचे कुसुम हे नाव बदलून चित्रा असे ठेवले होते. मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत चित्रा यांचे बालपण गेले. मुंबईत भवानीशंकर रोडवरील प्राथमिक शाळेत त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले.
१९५१ मध्ये ‘लाखाची गोष्ट’ हा त्यांचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गुळाचा गणपती’, ‘देवबाप्पा’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘बोलविता धनी’ या चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिका बजावल्या तर ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबम’, ‘टिंग्या’ या चित्रपटात त्यांनी आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रा आणि राजा नवाथे यांच्या मुलाचे तरुण वयातच अपघाती निधन झाले होते तर पती राजा नवाथे यांचेही २००५ साली आजारपणाने निधन झाले.