
मुंबई : तुम्हाला पक्षाचे काम करायचे नसेल तर पद सोडा आणि चालते व्हा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तुम्हाला निट काम करायचे नसेल तर पदावर कशाला राहाता? पदावरुन दूर व्हा, अशा शब्दांत त्यांनी पदाधिका-यांना खडसावले.
विभागीय पातळीवर जे पदाधिकारी पक्षाचे काम करत नाहीत, त्यांची यादी बनवण्याचे आदेश राज ठाकरेंनी विभाग प्रमुखांना दिले आहेत. आगामी काळामध्ये सर्वांनीच कामामध्ये सुधारणा करा, लोकांपर्यंत जावून कामे करा, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
पुढील महिन्यापासून राज ठाकरे दौऱ्यावर निघणार आहेत. सुरुवातीला ते कोकण विभागाचा दौरा करतील. त्यानंतर ते विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते.
अन्य महत्वाच्या बातम्या...