Tuesday, July 16, 2024
Homeमहामुंबईदिवाळीच्या ११ दिवसात एसटीला मिळाले २७५ कोटींचे उत्पन्न

दिवाळीच्या ११ दिवसात एसटीला मिळाले २७५ कोटींचे उत्पन्न

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या काळात हंगामी दरवाढ केल्यानंतरही सर्वसामान्य नागरीकांनी लालपरीवर मोठा विश्वास दाखवला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात दिवाळीसाठी सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमधून सुमारे ४ कोटी ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. या अकरा दिवसांत एसटीला सुमारे २७५ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले असून संपूर्ण महिनाभरात एसटी महामंडळाने ६४२ कोटी रूपयांच्या महसूलाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी एसटीने ५६ लाख किमीचा प्रवास करीत एकाच दिवशी ३१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि दिवाळीचा सण पाहता आपापल्या गावी किेंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात नियमित बसफेऱ्यांबरोबरच ‘दिवाळी स्पेशल’ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या काळात दरवर्षी प्रवासी दरात १० टक्के हंगामी दरवाढ केली जाते. या दरवाढीनंतरही प्रवाशांनी आपल्या लालपरीवर म्हणजेच एसटीवर विश्वास दाखवत प्रवास केला. या नागरीकांनी एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाड्यांचा लाभ घेत आपल्या इच्छितस्थळी प्रवास केला. २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सोडलेल्या जादा गाड्यांद्वारे ४ कोटी ९५ लाख प्रवाशांनी केलेल्या प्रवासाच्या माध्यमातून २७५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरीकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरीक’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत ७५ वर्षांवरील नागरीकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास करता येतो. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या योजनेतंर्गत ७५ वर्षांवरील २६ लाख ५५ हजार १३८ नागरीकांनी प्रवास करत सेवेचा लाभ घेतला आहे. तर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात ८० लाख ३८ हजार ०९१ ज्येष्ठ नागरीकांनी प्रवास केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -