विलास खानोलकर
साईबाबांनी पहिल्या दिवशी शिर्डीत प्रवेश केल्यापासून ते नंतर हजारो भक्त साईदर्शनास येऊ लागले तरी साई कधीच कंटाळले नाहीत. या-ना त्या मार्गाने साईंनी आपल्या भक्तांची ईच्छा पूर्णच केली. प्रेम, अहिंसा, श्रद्धा, सबुरी, सुशिक्षितता, मेहनत, परिश्रम, सामाजिक सुरक्षितता, निसर्गावर प्रेम, प्राणिमात्रांवर पशुपक्ष्यांवर प्रेम, गाई, गुरे, चिमणी पाखरे सर्वांवर अगणित प्रेम. सारी शिर्डी साई प्रेमळ नजरेवर सांभाळत असे. साई हिंदू- मुसलमान सर्व सणवार आनंदाने साजरा करीत. लेंडी बागेपासून ते द्वारकामाईपर्यंत तसेच नागपूरच्या बुट्टी श्रीमंताच्या वाड्यापासून परत द्वारकामाईपर्यंत दर गुरुवारी तसेच इतर सणावारीसुद्धा दिवाळीसारखी पालखी निघत असे. दिवाळीत पाची दिवस व देवदिवाळीपर्यंत साई भंडाऱ्यात हजारो साईभक्तांना जेवणखाण मिळत असे. प्रसादाची फळे व उदी घेऊन प्रत्येक भक्तास आनंद होत असे. दिवाळीला साईबाबारूपी लक्ष्मी कुबेर प्रसन्न झाल्यासारखा आनंद होत असे.
साई आज शिर्डीत आले
सारे भक्त आनंदा नहाले
लहान मोठे शिर्डीत आले
चालक बालक पालकही आले ।।१।।
श्रद्धासबुरीची करुणा प्रेमाची ती पणती
साई आज शिर्डीत आले
दिवाळी सण साजरे झाले
दसरा दिवाळी गालात हसले
काळोख सारे कोपऱ्यात बसले ।।२।।
साईच्या भक्तीभावाने पेटती पणती
ऐकाने दुसरी, दुसरीने तिसरी पणती
तेल नसता गंगाजलाने पेटली पणती
द्वारकामाईत पेटती
शेकडो पणती ।।३।।
शेकडो वर्षे तीच वात तीच पणती
नाही त्याची कधीच गणती
गंगुतेल्याने साईला नाकारून
केली शिरगणती
झाली वाण्याच्या पापाची
भरलेल्या घड्याची गणती।।४।।
दिवाळीला जगभरात
साईचीच होते भक्ती
प्रेमाच्या स्नेहाच्या
भक्तीत बुडलेली वाती
देवघरात साईरूपे उभी
राहते प्रेमभरे स्वाती ।।५।।
वारा न विझवी यास
पाणी न भिजवी यास
साईभक्तीच्या निरांजनात
फक्त प्रेमाची आस
भक्तांना प्रेमळ साई नामाचाच ध्यास
दिवाळी समजून साई
मदत करे त्यास ।।६।।
साधु संत येती घरा तोचि दिवाळी दसरा
भरपूर श्रम करा पण चेहरा ठेवा हसरा
नोकरीधंद्यात खोट, येणार नाही घसारा
प्रेम, श्रद्धा, सबुरी,
मानवता हाच खरा पिसारा ।।७।।
शिर्डीवाले साईबाबा धावत
आलो तुझ्याच दारा
पळवून लाव संकट सारी,
खूश कर कुटुंब पसारा
साईनामाचा जगभर
होतो गजर सारा
साई दिवाळीला येईन
शिर्डीच्या द्वारा ।।८।।