Tuesday, November 12, 2024
Homeमहत्वाची बातमीकोकणातील पर्यटनावर पावसाचे पाणी...!

कोकणातील पर्यटनावर पावसाचे पाणी…!

संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दररोज मुसळधार पाऊस कोसळतोय. सकाळ, दुपार, संध्याकाळ असा रतीबच पावसाने कोकणात लावला आहे. सूर्यदर्शन होईल तो आनंदाचा दिवस असेच वातावरण कोकणात तर राहिले आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर अखेरीस मेघगर्जनेसह पाऊस कोसळला की पाऊस परतीच्या मार्गावर आहे, असे समजायचे; परंतु अलीकडे काही वर्षे सहा-आठ महिने पाऊस अधून-मधून येतो. या वर्षी तर जानेवारी महिन्यापर्यंत पाऊस असेल, असे म्हटले जातेय. जानेवारीतही पाऊस असणार या कल्पनेनेच अनेक प्रश्नांची मालिका नजरेसमोर आली आहे. या कोसळणाऱ्या पावसाने शेती, बागायतींचे नुकसान तर केलेच आहे; परंतु त्याचबरोबर उद्योग, व्यवसायाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद पडतात की काय? अशी भिती वाटत होती. मागील आठ-दहा महिन्यांत कोरोनाच्या आघाताने कोलमडलेले व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. उभारी आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करीत असताना या वर्षी पावसाने ‘धुमशान’ घातले आहे. ऋतुचक्राच्या या बदलाने अनेक गोष्टी बिघडल्या आहेत.

दिवाळीचा सण आला आहे. कोरोनानंतर खऱ्या अर्थाने या वर्षी दिवाळी उत्साह असणारी आहे. मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय गरीब आणि गरीब अशी समाजव्यवस्थेची एक नवी वर्गवारी अलीकडे समोर येत आहे. या वर्षी शासकीय कर्मचाऱ्यांना राज्यसरकारने दोन महिन्यांचा बोनसही जाहीर केला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवला आहे. या सर्वांची दिवाळी पहाट आनंदाचीच आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात निसर्ग जे काही देईल तोच आनंद असणार आहे. ऋतुचक्रातील बदलाने शेतीचे काय होईल, फायदा की तोटा? हे कुणालाच ठरवता येणार नाही. अशी सध्याची स्थिती आहे.

कोकणात या सर्व राजकीय, सामाजिक आणि बदलत्या वातावरणातही पर्यटन व्यवसाय हाच काय तो आशेचा किरण बनला आहे. आठवड्यावर दिवाळी आली असताना कोकणात पाऊस कोसळतोय. दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणातील विविध भागांमध्ये पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. येणाऱ्या पर्यटकांमुळे कोकणातील अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते. अनेक व्यवसायांचे चक्र फिरते; परंतु सध्या कोसळत असणाऱ्या पावसाचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होऊ शकतो, अशी भिती काही पर्यटन व्यावसायिक व्यक्त करताना दिसतात. गेल्या काही वर्षांत कोकणातील पर्यटन व्यवसाय बहरत आहे. हा बहरणारा व्यवसायाला अधिक गती मिळाली. पर्यटकांची संख्या प्रत्येक सिझनला वाढत गेली, तरच व्यावसायिकांच्या हाती पैसे येतील. दिवाळी, डिसेंबर, मे महिना हा पर्यटन व्यवसायाचा हंगाम आहे. कौटुंबिक सहली या कालावधीत कोकणात येत असतात. पूर्वी देशभरातून गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. आजही गोव्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतातच; परंतु अलीकडे गोव्यात येणारा पर्यटक कोकणातील किनारपट्टी भागातही पर्यटनासाठी येऊ लागला आहे. अगदी रेडीपासून रत्नागिरीपर्यंतच्या किनारपट्टीवर पर्यटक फिरू लागले आहेत. तारकर्ली, देवबाग ही पर्यटनस्थळे तर देश आणि परदेशातील पर्यटकांच्या अत्यंत प्रिय, आवडीची पर्यटनस्थळे झाली आहेत.

आरेवारे, अलिबाग, केळवे, भोगवे या पर्यटनस्थळांची भुरळ पर्यटकांना तर आहेच. दिवाळीत पर्यटनासाठी कोकणात जायचे, असे नियोजन केलेल्या पर्यटक हा पावसाळा असाच राहिला, तर पावसाळ्यात फिरणार कसे? असा प्रश्न घेऊन कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी संख्या कमी होऊ शकते. पाऊस कमी होणे किंवा पाऊस आणखी कोसळत रहाणे हे निसर्गावरच अवलंबून राहणार आहे. पर्यटन व्यवसाय हेच सध्या तरी कोकणातील तरुणांचे रोजगाराचे साधन आहे.

तो एक आशेचा किरण आहे. कोकणात उद्योगांचेही जाळ निर्माण झाल पाहिजे; परंतु राजकीय स्वार्थासाठी विरोध करणाऱ्यांचा विरोध जोपर्यंत जनतेच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत विरोध करणाऱ्यांना बळ मिळत जाईल यातून राजकीय पुढाऱ्यांचा फायदा होईल; परंतु सर्वसामान्य जनतेचा त्यातून तोटाच होणार आहे. पर्यटन व्यवसाय अधिक बहरण्यासाठी सी- वर्ल्डसारखा प्रकल्प व्हायला हवा. कोकणातील प्रकल्पांना विरोधाने कोकणाचेच नुकसान होतेय, हे कधी कळणार कुणास ठाऊक. वर्षानुवर्षे हे प्रकल्प रखडवले जात आहेत, यातून नुकसान होत आहे.

कोकणातील पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी पर्यटन स्थळांवर मूलभूत सोईसुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अनेक अडथळे आणि अडचणी असल्या तरीही पर्यटन व्यवसायवाढीवर भर दिला पाहिजे. तेच कोकणातील कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. पावसाने पर्यटन व्यवसायावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला तरीही आपण हा व्यवसाय वाढविण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -