मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात लाच घेतल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांची चौकशी सुरू असल्यामुळे लटके यांचा राजीनामा अद्याप मुंबई महापालिकेने स्विकारलेला नाही, असे उत्तर महापालिकेने हायकोर्टात दिले.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा लिपिकपदाचा राजीनामा मुंबई महापालिकेने का स्विकारलेला नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. त्यावर उत्तर देताना पालिकेने स्पष्ट केले की, लटके यांच्यावर लाच घेतल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणांची चौकशी सुरु आहे.
दुपारी जेवणाच्या ब्रेक नंतर हायकोर्टात पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी महापालिकेने हायकोर्टाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ऋतुजा लटकेंविरोधात एक तक्रार असून ती अद्याप प्रलंबित आहे. एका तक्रारदाराने लटकेंच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे. लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी आम्ही करत आहोत. शिवाय लायसनिंगच्या एका प्रकारात त्यांनी लाच मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे वकील युक्तीवाद करत आहेत की म्हणूनच आम्ही त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.