‘जीव वाचवा, कृतीतून आशा जागवा’

Share

मृदुला घोडके

दर वर्षी १० सप्टेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिवस’ पाळला जातो. आत्महत्या या गंभीर सामाजिक समस्येबाबतचे समज, निषिद्धता, त्याची कारणं आणि आत्महत्येला प्रतिबंध इत्यादींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

‘आत्महत्या’ हा शब्द ऐकला किंवा वाचला तरी मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. सृष्टीची सुंदर निर्मिती, एक जीव, या जगात आणण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागतो… अनेक स्वप्नं रंगवली जातात… ती साकार करण्याचे प्रयत्न केले जातात. असे काही प्रयत्न अपयशी ठरले, स्वप्नांचा चुराडा झाला, मोठा अपेक्षाभंग झाला, तर तोच जीव, अकस्मात आपल्या प्रियजनांना दुःखाच्या सागरात लोटून, अज्ञात सुखाच्या शोधात निघून जातो… कधी परत न येण्यासाठी. त्याचे प्रियजन मात्र असंख्य अनुत्तरित प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकून पडतात… कदाचित कायमचे…

संपूर्ण जगात दर वर्षी सुमारे ८ लाख लोक आत्महत्येने मरण पावतात. म्हणजे दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या (NCRB) ताज्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भारतात एकूण १ लाख ६४ हजार ०३३ मृत्यू आत्महत्येमुळे झाले. दररोज ४५० आत्महत्या घडल्या. म्हणजे सुमारे साडे ३ मिनिटाला एका व्यक्तीने आपलं जीवन संपवलं. २०२० पेक्षा हा आकडा ७.२ टक्क्यांनी वाढला आहे.

या काळात महाराष्ट्रात, देशात सर्वाधिक २२ हजार २०७ आत्महत्या घडल्या, तर त्या खालोखाल तामिळनाडूमध्ये १८ हजार ९२५ लोक आत्महत्येने मरण पावले. यामध्ये प्रामुख्याने कामगार, मजूर, गृहिणी आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. ही स्थिती नक्कीच चिंताजनक आहे.

आत्महत्येची अनेक कारणे असू शकतात. कौटुंबिक समस्या, आजारपण, नशेचं व्यसन, अपयश, नातेसंबंध गुंतागुंत, दारिद्र्य, बेकारी, दिवाळखोरी, प्रेमभंग, सामाजिक इभ्रत इत्यादी समस्यांतून आलेले आत्यंतिक नैराश्य, हतबल झाल्याची आणि आपली काही किंमत नसल्याची तसेच एकाकीपणाची भावना अनावर झालेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग चोखाळू लागते.

आत्महत्येबाबत सामान्यजनांच्या मनात अनेक समज आढळतात. आपण आत्महत्या या विषयावर अजूनही उघडपणे आणि मोकळेपणाने बोलत नाही. असं बोललो, तर किंवा कुणा नैराश्यग्रस्त व्यक्तीला आपण तिच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत का?, असं विचारलं तर आपण त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतो किंवा तसे विचार मनात घालतो असा एक समज आहे. खरं तर एखाद्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला आत्महत्येबाबत आपण असं उघड विचारलं, तर त्या व्यक्तीशी संवाद साधता येतो. आपल्या चिंतेची, भीतीची कुणीतरी दखल घेत आहे, याची जाणीव त्या व्यक्तीला होते. आपल्याला समजून घेणारं कुणी तरी आहे असं वाटतं.

काही वेळा असं म्हटलं जातं की, ‘गरजेल तो पडेल काय’ मला जीव द्यावासा वाटतो, असं बोलणारी व्यक्ती, दुसऱ्यांना फक्त घाबरवत असते. मानसिक दडपण आणते. पण खरं तर तीच व्यक्ती अत्यंत मानसिक दडपणाखाली असते. आत्महत्येचा विचार बोलून दाखवणं म्हणजे मदतीसाठी शेवटचा प्रयत्न किंवा आर्त हाक आहे. त्या व्यक्तीला आपल्या जीवनातल्या वेदना संपवायच्या असतात. आपलं जीवन नाही. जेव्हा जगण्याची वेदना मरणाच्या वेदनेपेक्षा जास्त वाटू लागते तेव्हा जगणं नकोसं होतं.

आत्महत्या अचानक होतात, असंही म्हटलं जातं. पण ज्यांना आपलं जीवन संपवायचं आहे, अशा व्यक्ती अनेक संकेत देतात. कधी उघडपणे बोलून दाखवतात. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात बदल दिसून येतात. एखादी मितभाषी व्यक्ती खूप बोलू लागते किंवा खूप बडबडी व्यक्ती शांत, एकटी राहू लागते. आहारावर परिणाम होतो. भूक लागत नाही किंवा सारखी खाण्याची इच्छा होते. झोपेच्या पद्धतीत बदल होतात, चिडचिडेपणा वाढतो, सारखं रडू येतं, लक्ष लागत नाही, बेपर्वा वृत्ती होते, आपली मौल्यवान वस्तू दुसऱ्यांना अचानक भेट म्हणून दिली जाते, अचानक खूप आनंद व्यक्त केला जातो. हे सर्व धोक्याचे संकेत आहेत. हे संकेत दुसऱ्यांमध्ये आणि स्वतःमध्येही ओळखण्याइतपत आपण संवेदनशील असलं पाहिजे.

आत्महत्या रोखता येऊ शकतात का?

होय, आत्महत्या रोखता येऊ शकतात. आत्महत्या प्रतिबंध प्रयत्न वैयक्तिक, सामुदायिक आणि सामाजिक पातळीवर करता येतात आणि ते केले पाहिजेत. या वर्षी आत्महत्या प्रतिबंध दिनाचं ध्येय वाक्य आहे – ‘कृतीद्वारे आशा जागवा’
असे धोक्याचे संकेत आपल्याला दिसून आले, तर त्या व्यक्तीशी संवाद साधा. आत्मीयता दाखवा. त्यांचं म्हणणं शांतपणे, संयमाने ऐकून घ्या. त्याची गंभीर दखल घ्या. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत का, असं विचारायला कचरू नका. आत्महत्येसाठी त्यांच्याजवळ काही साधन आहे का, ते विचारा… ते साधन काढून घ्या/दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या मनातील भावनांचा कल्लोळ शांत झाल्यानंतर कदाचित ती व्यक्ती आपल्या समस्येबाबत तर्कसंगत विचार करू शकेल. परिस्थिती कठीण आहे असं वाटलं, तर तज्ज्ञांची मदत मागा. मानसिक आधार देणाऱ्या अनेक हेल्पलाइन आहेत. त्यांची मदत घ्या. त्यानंतरही त्या व्यक्तीच्या संपर्कात राहून त्यांची आत्मियतेने विचारपूस करा. असं केल्याने त्या व्यक्तीचा एकटेपणा कमी व्हायला मदत होते.

‘कनेक्टिंग’ नावाची एक स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात मानसिक आणि भावनिक आधार देण्याचे काम गेली १७ वर्षे करत आहे. ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या दूरध्वनी क्रमांकावर तणावग्रस्त व्यक्ती मोकळेपणाने बोलू शकतात. ही सेवा निःशुल्क आणि गोपनीय आहे आणि वर्षाचे ३६५ दिवस दुपारी बारा ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असते.

एका आत्महत्येचा सुमारे ११० जणांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. ज्यांच्या घरात आत्महत्या घडली आहे, ज्यांनी त्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना आणि त्यांच्या आप्तजनांना भावनिक आधार देण्यासाठी ‘कनेक्टिंग’ची ‘सर्वायवर सपोर्ट’ हेल्पलाइन असून त्याचा नंबर ८४८४०३३३१२ असा आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात, नैराश्यग्रस्त लोकांना आपण मदतीचा हात देऊ शकतो. थोडी जागरूकता दाखवून, संवेदनशीलता दाखवून… अशी कृती करून आपण आशा निर्माण करू शकतो… एखादा जीव वाचवू शकतो.

Recent Posts

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…

10 minutes ago

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…

21 minutes ago

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

52 minutes ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

53 minutes ago

Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…

1 hour ago

Ram Charan: अभिनेत्याच्या जिद्दीला सलाम! केलं कठोर व्रत आणि अखेर चित्रपटाला मिळालं ऑस्कर!

मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…

1 hour ago