वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील वरले येथील हॉटेल राजवाडा येथे दोन गटात शुल्लक कारणावरुन तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी १६ रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. एका गटातील राहुल पाटील, दहेश ठाकरे, चेतन पाटील तर दुस-या गटातील निलेश ठाकरे, सत्यवान भोईर हे इसम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील किरवली येथील राहुल पाटील यांचा चुलत भाऊ चेतन याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आर्या डेव्हलपर्सच्या कार्यालयामध्ये साजरा करून राहुल व त्याचे मित्र जेवण आटोपून घरी जात होते. त्यानंतर चेतन हा राजवाडा हॉटेल याठिकाणी पाण्याची बाटली आणण्यासाठी गेला असता, त्याचे पाठोपाठ राहुल ही तिथे गेला. तिथे आरोपी सत्यवान भोईर हा राजवाडा हॉटेल मधील वेटरशी भांडण करत होता. सदरचे भांडण सोडवण्यासाठी चेतन याने मध्यस्थी केली असता, आरोपी सत्यवान याच्या अंगरक्षकाने चेतनला मारले.
त्यामुळे चेतन बेशुध्द पडला म्हणून आरडाओरडा करून त्याच्या सहकाऱ्यांना बोलवल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी लोखंडी रॉड, फायटरने जोरदार हल्ला चढवल्याने राहुल, दहेश व चेतन यांच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे येथील खाजगी रूग्णालयात तर दुसऱ्या गटातील निलेश ठाकरे व सत्यवान भोईर यांनाही गंभीर दुखापती झाल्याने त्यांनाही ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत दोन्ही गटांवर कलम ३०७ तर दुसऱ्या गटातील ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण आठ आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ पाटील करीत आहेत.