विरार (प्रतिनिधी) : वसई विरार शहरात प्रेक्षणीय पर्यटनस्थळांना पर्यटकांची नेहमीच पसंती असते. त्याचसोबत वसईत विस्तीर्ण समुद्रकिनारे आहेत; पण या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवरील प्रदूषणाचा विळखा सोडविण्यासाठी वसई-विरार महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पर्यटनस्थळांसोबत समुद्रकिनाऱ्याला नवी झळाळी देण्यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे. यासाठी युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. तसेच किनाऱ्यावर स्वच्छतेसाठी पालघर जिल्हा परिषदेकडून विशेष मशीन उपलब्ध केली जाणार आहे.
वसईत सुरुची बाग, राजोडी, अर्नाळा, भुईगाव या ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी असतेच; तसेच अर्नाळा किल्ला, इतर धार्मिक ठिकाणे, डोंगराळ भागातील धबधबे, पुरातन वास्तूसह अनेक भागात मुंबई व आजूबाजूच्या परिसरातून इतिहासप्रेमींसह पर्यटकांची वसईत रीघ असते; परंतु बऱ्याचदा प्लास्टिकसह अन्य कचरा हा किनारी टाकला जातो. त्यामुळे जलप्रदूषणाचा धोका निर्माण होत असतो.
प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टणासह इतर कचरा हा समुद्रकिनाऱ्यावर भिरकावून अनेक पर्यटक निघून जातात. तसेच समुद्रातून बाहेर येणाऱ्या कचऱ्याचीदेखील भर किनारी पडत असते. हे चित्र बदलण्यासाठी सामाजिक संस्था, तरुणाई, स्थानिक ग्रामस्थ सफाई मोहीम हाती घेतात. महापालिकेने १७ ते २ ऑक्टोबर या कालावधीत समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत योजना आखली जात असून यात तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. महापालिकेच्या या मोहिमेंतर्गत पर्यावरणावर होणारा परिणाम, प्रदूषणाचा धोका यासंबंधी जनजागृतीदेखील केली जाणार आहे. तसेच प्रेक्षणीय स्थळांना स्वच्छ ठेवण्यासाठीदेखील काम केले जाणार आहे. या स्वच्छतेसाठी पालघर जिल्हा परिषदेकडून मशीन उपलब्ध केली जाणार आहे.
वसई विरार महापालिका २०२१ साली ‘ट्रॅश हंटर’ मशीन खरेदी करणार होती. या मशीनने समुद्रकिनारे एकाच वेळी स्वच्छ होणार होते; परंतु किमत जास्त असल्याने यावर अद्याप निर्णय झाला नाही; तर पालघर जिल्हा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या मशीनचा प्रयोग यशस्वी झाला; तर महापालिका खरेदीचा विचार करणार आहे.