ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात लंपी त्वचारोगाचे संशयित जनावरे आढळली असून आतापर्यंत १४ जनावरांमध्ये बाधित असल्याचे दिसून आले आहे. या रोगापासून जनावरांना वाचविण्यासाठी राज्य शासनाकडून पर्याप्त लस उपलब्ध झालेली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून दहा हजार लसीची मागणी केलेली आहे. लंपी आजाराशी लढा देण्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी सांगितले आहे.
ठाणे जिल्ह्यात लंपी स्किन डिसीजची संशयित जनावरे लोकनगरी अंबरनाथ, शहापूर येथील आसनगाव आवाळे व चेरपोली, तसेच भिवंडी येथील धामणगाव व भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीत सापडल्यानंतर त्यांचे रक्तजल नमुने व इतर तत्सम नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. या नमुन्यांची चाचणी ९ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने ठाणे जिल्ह्यात लंपी स्किन डिसीज या रोगाचा शिरकाव झाला आहे. १३ सप्टेंबर रोजी भिवंडी येथे तीन जनावरे बाधित आढळले असून शहापूर तालुक्यात किनवली अस्नोली व पाषाणे येथे एकूण पाच जनावरे बाधित आढळली आहेत. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात एकूण १४ बाधित जनावरे आतापर्यंत आढळली आहेत, असे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत जवळजवळ चार हजार जनावरांचे लसीकरण करून झालेले आहे. बाधित तालुक्यांमध्ये इतरत्र लंपीची जनावरे आढळल्यास ताबडतोब त्याच्या आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिघातील सर्व जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. कल्याण व मुरबाड तालुक्यात या रोगाची लक्षणे दिसल्यास त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील, असे विभागाने कळविले आहे.
अशी घ्या काळजी
लंपी स्किन डिसीज हा विषाणूने होणारा रोग असून तो झूनोटीक रोग नाही म्हणजेच जनावरांपासून माणसाला हा रोग होत नाही. या रोगाची लक्षणे म्हणजे जनावर खाणेपिणे सोडून देतो किंवा कमी खातो. तसेच त्याला ताप येतो, डोळ्यातून व तोंडातून चिकट स्त्राव येतो, पायाला सूज येते आणि अंगावर १०-२० मिमिच्या गाठी निर्माण होतात. परंतु हा रोग संसर्गजन्य असल्याने हा एका जनावरांपासून दुसऱ्या जनावराला या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जे जनावर या रोगाने आजारी आहे, त्यास ताबडतोब वेगळे केले पाहिजे व नजीकच्या पशुवैद्य केंद्राला त्याची सूचना दिली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
१०० टक्के लसीकरणाची प्रक्रिया सुरू
पशुवैद्यकाकडून बाधित जनावराची उपचार करून घेणे तसेच माशा गोचीड व इतर तत्सम कीटक यांच्यापासून दुसऱ्या जनावरांना याचा संसर्ग होऊ नये यासाठी कीटकनाशक फवारणी करून घेणे आवश्यक आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी गोठ्यांमध्ये जंतुनाशक फवारणी करून घ्यावेत. जी जनावरे पॉझिटिव्ह आली त्या जनावरांपासून पाच किलोमीटरच्या परिघाच्या क्षेत्रातील सर्व जनावरांचे १०० टक्के लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.