नांदगाव-मुरुड (वार्ताहर) : होळी, नारळी पौर्णिमेप्रमाणेच गणेशोत्सव हा देखील कोळी बांधवांचा अत्यंत श्रद्धेचा आणि महत्त्वाचा सण असल्याने मच्छीमार मुंबईतून आपापल्या गावी परतत असून मंगळवारी दुपारपर्यंत राजपुरी, मुरूड, एकदरा आदी गावांतील सुमारे शंभरहून अधिक दालदी नौका वाजतगाजत गावाकडे परतल्या.
कोळी बांधव मूलतः श्रद्धाळू व देवभोळा असल्याने येथे घरोघरी गणेशमूर्ती स्थापित करण्याची वेगळीच परंपरा दोनशे वर्षांपासून अखंडित सुरू असल्याची माहिती रायगड मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली. मासेमारीसाठी कोळी बांधवांना समुद्रात मासळीसाठी कुठेही बाहेर जावे लागते. परंतु गणेशोत्सवासाठी आमचे बांधव गावी हमखास येतातच, अशी माहिती मुरूड नवापाडा कोळी समाजाचे नूतन अध्यक्ष यशवंत सवाई यांनी दिली मुरूडच्या सुमारे ३० ते ३५ नौका मुरूड खाडीत दाखल झाल्याची माहिती सवाई यांनी दिली. राजपुरी, एकदरा, मुरूड, बोर्ली, कोर्लई येथील नौका किनाऱ्यावर दुपारी दाखल झाल्या आहेत.
तर मुरूड, एकदरा, राजपूरी, बोर्ली, नांदगाव येथील नौका मुंबईतून गावी दाखल झाल्या असून समुद्र किनाऱ्यावर मंगलमय जल्लोष पाहायला मिळत आहे. सर्वत्र घरांची रंगरंगोटी, स्वच्छता पाहायला मिळत आहे. मुरूड तालुक्यात नव्वद टक्के घरगुती गणेशोत्सवाची परंपरा आजही पाहायला मिळते. पूर्वी मुरूड तालुक्यातील घरगुती गणेशोत्सवात चलत चित्रांचे भरपूर देखावे असत. राजपूरी, एकदरा, मुरूड, नांदगाव, बोर्ली, मजगाव येथील घरोघरी हे देखावे असत. मात्र आता मनुष्यबळ, आर्थिकबळ कमी झाल्याने काळानुरूप ही परंपरा दिवसेगणिक कमी झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी काही भक्तांनी पावसाच्या भीतीने गणेश मूर्ती घरी नेल्या. गणेश पूजा साहित्य घेण्यासाठी मुरूड मुख्य बाजरपेठेत तुडुंब गर्दी मात्र दिसून आली.