Sunday, June 15, 2025

भाजप आमदार टी राजा यांची पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी; गुन्हा दाखल

भाजप आमदार टी राजा यांची पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी; गुन्हा दाखल

तेलंगणा : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा प्रकरण अजून संपलेले नाही तोच तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांची वादग्रस्त टिप्पणीही समोर आली आहे. भाजप आमदाराने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. रात्री उशिरा मोठ्या संख्येने लोकांनी भाजप आमदाराच्या विरोधात निदर्शने करत त्यांच्या अटकेची मागणी केली.


दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, भाजप आमदार टी राजा सिंह यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डीसीपी पी साई चैतन्य म्हणाले की, काल रात्री दक्षिण झोन डीसीपी कार्यालयात मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली होती. भाजप आमदाराने एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे लोकांचे म्हणणे आहे. डीसीपी चैतन्य म्हणाले, आमदाराविरुद्ध अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भाजप आमदार टी राजा सिंह यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओबाबत त्यांनी कथितरित्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांची पोस्ट व्हायरल झाली आणि बघता बघता लोकांनी रात्री उशिरा डबीरपुरा, भवानी नगर, मिचोक, रेनबाजार येथील पोलीस स्टेशन गाठले आणि विरोध सुरू केला.


यापूर्वी टी राजा सिंह यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकीलाही धमकी दिली होती. त्याचा शो रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती. शुक्रवारी, टी राजा मुनव्वर फारुकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले होते.

Comments
Add Comment