विरार (प्रतिनिधी) : गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. अशातच नालासोपारा येथे शौचालयासाठी गेलेली एक १५ वर्षीय मुलगी नाल्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मंगळवारी सकाळपासूनच वसई-विरार शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दिवसभरातही पावसाने आपला जोर कायम ठेवला. यामुळे परिसरातील नाले भरून वाहू लागले आहेत. अशातच नालासोपारा धाणीवबाग परिसरात राहणारी १५ वर्षीय दीक्षा यादव घराजवळील नाल्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा ही धाणीवबाग येथिल सिद्धीविनायक चाळीत राहत होती.
दुपारी १ वाजताच्या सुमारास ती घराजवळील शौचालयात गेली होती. हे शौचालय नाल्याला लागूनच आहे. परत येताना पावसाने जमीन ओली असल्याने तिचा पाय घसरला आणि तोल जाऊन ती नाल्यात पडली. पावसामुळे नाला अधिक प्रवाहाने वाहत असल्याने ती प्रवाहाबरोबर वाहत गेली. सदर घटनेने पुन्हा एकदा उघड्या नाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण मागील आठवडाभरात उघड्या नाल्यात वाहून गेल्याची ही दुसरी घटना आहे. या अगोदर महापालिकेचा सफाई कर्मचारी उघड्या नाल्यात वाहून गेला होता. आठ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. तर मागच्या वर्षी उघड्या नाल्याचा शिकार ठरलेला आठ वर्षीय अमोल सिंग याचा अजूनही पत्ता लागलेला नाही.