कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतच्या सरपंच साक्षी संतोष मोहिते यांच्यासह बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी कर्जत विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर समर्थन देत नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेनेचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे यांना शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरचा आहेर दिला आहे.
त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी कितीही आघाड्या करत कुरघोड्या केल्या तरी, या विधानसभा क्षेत्रात विकासात्मक दूरदृष्टीतून जे पेरले आहे तेच उगवणार याचा मला व सहकार्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे, असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवतीर्थ पोसरी येथे उपस्थितांना केले.
कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कर्जत विधानसभेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत विकासात्मक दूरदृष्टी असलेल्या नेत्याला अर्थात आमदार थोरवे यांना जाहीर समर्थन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला. त्यामध्ये चांधई, नसरापूर, सालवड, गणेगाव, चिंचवली, कळंबोली आदी गावांतील ग्रामस्थांचा सहभाग आहे. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, विधानसभा संघटक संतोष भोईर, माजी उपसभापती मनोहर थोरवे, संतोष मोहिते, नगरसेवक संकेत भासे, विभागप्रमुख सुनील रसाळ, सरपंच संतोष कोळंबे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार व खासदार यांनी भाजपाच्या माध्यमातून महायुती सरकार स्थापन करुन विकासात्मक दूरदृष्टी व जनहिताचे सरकार स्थापन करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करत स्वप्न सत्यात उतरवल आहे. त्यामुळे आम्हाला अभिप्रित असणारे सरकार राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळतील हा विश्वास आम्हाला आहे. म्हणूनच नसरापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच, सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार महेंद्र थोरवे यांना समर्थन देत असून त्यांच्या विकासात्मक दूरदृष्टीला जाहीर पाठिंबा देत आहोत. -संतोष कोळंबे (माजी सरपंच, नसरापूर ग्रामपंचायत)