मुंबई (वार्ताहर) : बर्मिंगहॅम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने २२ सुवर्णांसह ६१ पदकांची कमाई करताना चौथे स्थान मिळवले आहे. पदक विजेत्यांमध्ये मुंबईचे अवघे तीन खेळाडू आहेत. त्यात बॅडमिंटन दुहेरीत सुवर्ण कामगिरी केलेला चिराग शेट्टी आणि टेबल टेनिस विजेत्या पुरुष संघातील सनिल शेट्टी यांचा समावेश आहे.
मुंबईच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण तितक्याच रौप्यपदकांमध्ये सहभाग दर्शवला आहे. मात्र, ही चारही पदके सांघिक खेळातील आहेत. मुंबईचा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी याने पुरुष दुहेरीत सत्विकराज रनकीरेड्डीसह बाजी मारली. बॅडमिंटन मिश्र संघाच्या रौप्य पदकामध्येही त्याचा समावेश आहे.
सनिल शेट्टी याचा सहभाग असलेल्या टेबल टेनिस पुरुष संघाने बाजी मारली. महिला क्रिकेट संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या संघात महाराष्ट्राच्या स्मृती मन्धाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा समावेश होता.
राज्यातील क्रीडापटूंच्या कामगिरीचा विचार करता मांडवा, बीडचा धावपटू अविनाश साबळे याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदक मिळवले. २१ वर्षीय सांगलीचा वेटलिफ्टर संकेत सरगर याचे पुरुषांच्या ५५ किलो गटातील सुवर्णपदक थोडक्यात हुकले.