Wednesday, July 2, 2025

आमचे साक्षात परमेश्वर

आमचे साक्षात परमेश्वर

माझे चहाचे हॉटेल आहे. तोच माझा व्यवसाय. माझी पत्नी शिक्षिका होती. मला महाराजांचे प्रथम दर्शन माझ्या चहाच्या हॉटेलमध्येच झाले. प. पू. राऊळ महाराज माझ्या दुकानांत येऊन बसले व चहा मागीतला. दुकानात गिऱ्हाईक असल्याने मी प्रथम लक्ष दिले नाही. गिऱ्हाईक कमी झाल्यावर मी पाहिले की अंगात कोट, धोतर नेसलेले, डोकीस फेटा बांधलेला व हातात विणा(तंबोरा) घेऊन ते दुकानात बसले होते. मी त्यांच्याकडे पाहत विचार करू लागलो. ही व्यक्ती कोण असावी? ही इ.स. १९५२ ची गोष्ट आहे. मी त्यांना चहा दिला. त्यांनी १ चहा पिऊन झाल्यावर आपल्या हातातील एकतारी वाजवून-भजन म्हणायला सुरुवात केली. त्यांचा तो देहभान विसरून पहाडी आवाजात परमेश्वराशी एकरूप झालेला चेहरा पाहून लोक तटस्थ होऊन पाहातच राहिले.


इतक्यातच पिंगुळी गावचा एक भिक्षुक चहा पिण्यासाठी आमच्या हॉटेलमध्ये आला. त्याने प्रथम आबा म्हणून हाक मारली व त्यांना नमस्कार केला. त्याला महाराजांनी आपल्या अंगावरचा कोट व डोकीचा फेटा दिला. मी थक्क होऊन पाहातच राहिलो व त्या व्यक्तीकडे महाराजांविषयी चौकशी केली. तेव्हा ते पिंगुळी गांवचे असून, त्यांचे घर, आई वगैरे तसेच कुटुंबातील सर्व माणसे पिंगुळी गांवीच असतात. त्यांना सर्व आबा म्हणतात. ते गावचे मानकरी असून रवळनाथ यांच्या गावचा देव आहे वगैरे माहिती सांगितली. त्यानंतर मी प. पू. राऊळ महाराजांच्या चरणी मस्तक ठेऊन नमस्कार केला. तेवढ्यातच माझी पत्नीही तेथे आली. त्यामुळे त्यांच्या दर्शनाचा लाभ तिलाही झाला. तिने त्यांना नमस्कार केला व महाराज आपण आमच्या घरी आज भोजन करावे असा आग्रह केला. महाराज स्वस्थ बसून होते. थोड्या वेळाने माझे जेवण झाले, असे म्हणून ते दुकानातून बाहेर पडले. कुठे गेले ते मात्र समजले नाही.


त्यानंतर ते पंधरा दिवसांनी पुन्हा दुकानात आले व नंतर ते सतत अधून-मधून येत असत. पुढे काही दिवसांनंतर आमचे भाग्य थोर म्हणून साक्षात प. पू. राऊळ महाराज हे दोन वर्षे आमच्या घरी राहिले. कुठूनही फिरून येत; परंतु मुक्काम आमच्याकडेच करायचे. या दोन वर्षांत दुकानात आले की दुकानातील पदार्थ वाटणे, शिव्या देणे, कधी-कधी भजन करणे हे चालूच असे. आम्ही उभयता मात्र ते सर्व पाहून धन्य झालो. कारण एवढ्या मोठ्या सत्पुरुषांचा सहवास आम्हाला लाभला. त्यांनी काहीही केले तरी आमचे नुकसान कधीच झाले नाही.


तर सतत भरभराटच होत गेली. आम्हाला नफ्या-तोट्याची चिंता नव्हती. आम्हाला फक्त आमच्या राऊळ बाबांचा सहवास हवा होता. त्यांची सेवा घडावी हीच इच्छा होती. त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरा देव नव्हता. आमचे साक्षात परमेश्वर होते. आमची एक मुलगी आहे. तिला पण महाराजांच्या विषयी फार आदर. ती आपल्या सासरी सुखाने नांदत आहे. तिलाही मुले-बाळे आहेत. ती पिंगुळी गांवी येत-जात असते.


- समर्थ राऊळ महाराज

Comments
Add Comment