अनुराधा दीक्षित
तुम्ही गौरी सावंत, दिशा पिंकी शेख, गंगा, लक्ष्मी त्रिपाठी… ही नावं ऐकली असतील… नव्हे टीव्हीवरही पाहिलंय का ह्यांना? वाटतायत् ना ओळखीचे चेहरे? आता ह्या चेहऱ्यांना सारं जग ओळखू लागलंय! पण खूप घुसमट, खूप संघर्ष, अपमान, अवहेलना वगैरेंशी सामना केल्यावर! त्यांच्या नावांवरून त्या स्त्रिया आहेत हेही कळलं असेल… मग त्यात काय विशेष? असं म्हणाल तुम्ही. पण तेच तर विशेष आहे! कारण त्यांची आधीची नावं पुरुषांची होती… नंतर बऱ्याच काळानंतर त्यांना वरील नावांनी स्वतःची ओळख मिळाली. आता नक्कीच लक्षात आलं असेल, मी कोणाविषयी बोलतेय. बरोब्बर. आपण ज्यांना तृतीय पंथीय म्हणून ओळखतो, तेच हे चेहरे आहेत.
ही सारी आपल्यासारखीच हाडामांसाची माणसं आहेत हो. त्यांनाही इच्छा-आकांक्षा, भावभावना आहेत. फरक एवढाच की सर्वसाधारण स्त्री-पुरुषांना स्वतःची अशी एक बालपणापासून ओळख, नाव, प्रतिष्ठा मिळते. पण, तृतीय पंथीयांना या साऱ्या साध्या गोष्टींसाठी झगडावं लागतं.
आपल्याला आधारकार्ड, रेशनकार्ड, इलेक्शन कार्ड सहजपणे मिळतं. यांना कित्येक वर्षे लढून, झगडून ते मिळवावं लागतं. त्यांची दु:ख, समस्या, वेदना ऐकून घेणारा कोणी नसतो. त्यांना स्वतःचं घरही मिळवायला खूप प्रयास पडतात. त्यांच्याकडे आजपर्यंत समाज अतिशय तिरस्काराने पाहात आलाय. त्यांना जवळ येऊ देत नाही, म्हणून त्यांना टाळ्या वाजवून भीक मागावी लागते.
दिशा पिंकी शेख हिच्याशी आमचा जवळून परिचय होईपर्यंत आमच्याही मनात खूप गैरसमज होते. दिशा ही कवयित्री आहे. तिच्या ‘कुरूप’ या काव्यसंग्रहाला नुकताच एक पुरस्कार कणकवलीच्या एका संस्थेतर्फे देण्यात आला. आमच्या ऐलमा पैलमा अक्षरदेवा ह्या सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ती प्रमुख पाहुणी होती. तेव्हा तिने जे भाषण केलं, ते हिजड्यांचं दाहक वास्तव सांगणारं होतं. तिच्या भाषणाने तृतीय पंथीय किंवा ट्रान्सजेंडर व्यक्तींकडे बघण्याचा आमच्यासकट तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचा दृष्टिकोन बदलून गेला. आमच्या समूहाशी तिचा स्नेहबंध जुळला. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ती सिंधुदुर्गात येत राहिली. आमच्याशी लॉकडाऊनच्या काळात तिने ऑनलाइन गप्पा मारल्या. आपला आश्रम दाखवला. तिच्याबरोबर राहणाऱ्या तिच्या सख्यांशी ओळख करून दिली. लॉकडाऊनचा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. आमच्या समूहातील आम्ही अनेकींनी त्यांना आर्थिक हातभार लावला… असो. आता केंद्र सरकारनेही त्यांच्यासाठी काही योजना, सवलती, शिक्षण, नोकरी या संदर्भात काही विधायक निर्णय घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न चालवलेत, ही बाब समाधान देणारी आहे.
अगदी काही दिवसांपूर्वीच एक बातमी वाचली आणि खूपच बरं वाटलं. ती बातमी होती, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका जि. प. प्राथमिक शाळेत एका तृतीय पंथीय महिलेला शिक्षकाची नोकरी मिळाली. देशातील ही पहिलीच घटना आहे! त्या शिक्षिकेचं नाव आहे रिया आळवेकर!
तिने सीईटी परीक्षा मेरिटमध्ये उत्तीर्ण होऊन ही नोकरी मिळवली. तिने दहा वर्षे ही नोकरी पुरुषी कपडे परिधान करून इमानेइतबारे केली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले. पण मनात तिची खूप घुसमट होत होती. कारण पुरुषाच्या शरीरातलं मन मात्र एका स्त्रीचं होतं. तिला मुलींच्यात, स्त्रियांबरोबर राहावं, त्यांच्यासारखे कपडे परिधान करावेत असं वाटे. त्यामुळे मनावर ताण यायचा. तिला कोणत्या टॉयलेटमध्ये जावं हा प्रश्न पडायचा. रात्री झोप लागेना. मग आरशाशीच बोलत ती ढसाढसा रडायची. आपल्या या अवस्थेचा कुटुंबाला त्रास नको म्हणून एक दिवस घर सोडून जायचा धाडसी निर्णय तिने घेतला.
तिला कोल्हापूर आणि नाशिक इथे तिचे गुरू भेटले. त्यांच्याच मार्गदर्शनाने तिने पुढील वाटचाल केली. तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना भेटून आपली सर्व कहाणी सांगितली. त्यांनी सहृदयतेने ती ऐकून त्यांनी आपल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिच्यासाठी जे जे करता येईल, ते सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी एका शासकीय शाळेत तिची शिक्षिका म्हणून नेमणूक केली आणि सीईओ प्रजित नायर यांनी तिला आपली स्वीय सहाय्यक म्हणून कामगिरी दिली. त्यामुळे रियासाठी ही देवमाणसं आहेत. दरम्यान तिने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे आता ती महिला म्हणून शासकीय सेवा बजावत आहे. जिल्हा प्रशासनातील सर्वच अधिकारी तिला सन्मानाने वागवतात. त्यामुळे आज तिला ही प्रतिष्ठा मिळवून देण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सर्वांसाठी हा एक आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल संबंधित सर्वच अभिनंदनास पात्र आहेत.
रिया म्हणते, “माझे चार जन्म झाले असं मी मानते. एक आईच्या पोटात असताना, मुलगा म्हणून जन्माला येताना दुसरा, तृतीयपंथीय म्हणून जाणीव झाल्यावर तिसरा आणि तिच्या समाजाला प्रतिष्ठा मिळवून देणारा हा चौथा जन्म.” जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी तिच्यासाठी आईच आहेत. तिची शाळेत जी टॉयलेटला जाण्यासाठी कुचंबणा व्हायची, त्याबद्दल तिने मोकळेपणाने त्यांना सांगितल्यावर त्यांनी तिच्यासाठी वेगळी सुविधा निर्माण केली. आज ती ताठमानेने स्त्री वेषात वावरू शकते. प्रत्यक्ष शासकीय यंत्रणाच तिच्या पाठीशी उभी असल्याने तिचं जीवन सुकर झालंय.
तिच्या मते अन्न, वस्त्र, निवारा या आता मूलभूत गरजा राहिल्या नसून सामाजिक प्रतिष्ठा ही मूलभूत गरज आहे. आज ती रियाला मिळाली आहे.
अशा अनेक रिया आज समाजात वावरत असतील. त्यांचीही अशीच घुसमट होत असेल. काहींकडे शिक्षणही असेल, पण समाजाच्या दूषित दृष्टिकोनामुळे आपले सारे पाश तोडून बेघर व्हायला त्यांना भाग पाडलं जात असेल. मग टाळ्या वाजवून पोट भरण्याशिवाय त्यांच्याकडे काय उरतं? सगळ्यांनाच के. मंजूलक्ष्मी किंवा प्रजित नायर यांच्यासारखी देवमाणसं भेटत नाहीत!
साक्षात शिवशंकरांनी अर्धनारीनटेश्वराचं रूप घेऊन स्त्री-पुरुषांइतकेच ज्यांना किन्नर, हिजडा, छक्का अशा नावांनी हिणवलं जातं, ती वास्तविक इतरांसारखीच माणसं आहेत, त्यांच्यातही बुद्धी, कला, कौशल्य, शक्ती, सामर्थ्य सारं काही असू शकतं, हेच नाही का शिकवलंय?
हिजडा शब्दाचा खरा अर्थ आशीर्वाद देणारा, दुसऱ्याचं भलं चिंतणारा असा आहे, हेही रियानं सांगितलंय! तिच्यासारख्या मुली रियांकडे आपणही त्या दृष्टीने बघायला शिकूया ना! म्हणजे स्त्री, पुरुष, तृतीय पंथीय असा भेदभाव उरणारच नाही. सगळ्यांनाच जीवन सुखाने जगण्याचा अधिकार आहे, तो आपण त्यांनाही देऊ या! बघा पटतंय का?