Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

काही वेळातच ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता.

खासदार संजय राऊत यांची गेल्या ९ तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु होती. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. ईडीच्या सात अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रे आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. या दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.

…नाही तर पुढची मुलाखत जेलरला द्यावी लागेल!

निलेश राणे यांचा घणाघात

ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करा. उगाचच धुमाकूळ घालू नका. नाही तर पुढची मुलाखत जेलरला द्यावी लागेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी रविवारी दिला. ही नाटके थांबवा. भाड्याची माणसे घराबाहेर उभी करून उगाचच धुमाकूळ घालू नका. पोलिसांचे बांबू बसतील तेव्हा संध्याकाळी एकही नाव काढणार नाही टेबलवर… ईडीला सहकार्य केले तर एखादवेळेला मार्ग निघू शकतो, असेही निलेश राणे म्हणाले.

…तर सकाळ खराब झाली नसती : आमदार नितेश राणे

संजय राऊत यांना ईडीने हजर राहण्यासाठी तीन वेळा नोटीस दिली. परंतु काहीतरी कारणे सांगायची आणि पळ काढायचा. पळपुटे म्हणतात ना त्याप्रमाणे… अहो बाळासाहेबांच्या शपथा घेण्यापेक्षा ईडीला सामोरे गेला असता, तर आज सकाळ अशी खराब झाली नसती, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.

कर नाही तर डर कशाला? : मुख्यमंत्री शिंदे

काही केले नाही, तर घाबरण्याचे काही कारण नाही. तपास यंत्रणा त्यांचे काम करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावरील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईनंतर व्यक्त केली.

माफिया नेता ईडीकडे : किरीट सोमय्या

माफिया पोलीस अधिकाऱ्यानंतर माफिया नेत्याला ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली.

शरद पवारांची शपथ घ्या : रामदास कदम

संजय राऊत यांनी आपला काही संबंध नाही, हे सांगण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतली आहे. खरे तर त्यांनी शरद पवारांची शपथ घेतली पाहिजे. त्यांच्यासाठीच ते काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -