विलास खानोलकर
स्वामी समर्थ नरसाप्पा सुताराकडे कधी गेले; तर त्यांनी आपल्या घरी पुष्कळ दिवस राहावे, असे त्यांना नेहमीच वाटे. एकदा श्री स्वामी आठ दिवस त्याच्या घरी मुक्कामास होते. श्री स्वामी रात्री निघून जातील म्हणून तो घराच्या उंबऱ्यात निजत असे. दिवस सुगीचे होते. श्री स्वामी समर्थ घरी मुक्कामास असल्याने नरसाप्पास शेतावर जाता येईना. सुगीच्या दिवसात नुकसान झाले तर कसे करावे? असा त्यास प्रश्न पडून तो अस्वस्थ झाला. त्याच्या अंतःकरणातील भाव आणि त्याची अस्वस्थता जाणून पहाटे चार वाजता श्री स्वामी समर्थ दरवाजा उघडून नरसाप्पाच्या घराबाहेर जाऊ लागले.
त्याने श्री स्वामींस न जाण्याविषयी पुष्कळ प्रर्थना केली. पण ”सुगीचे दिवस आहेत, तुला अडचण होते, म्हणून आम्ही जातो.” असे म्हणून श्री स्वामी महाराज चालू लागले. नरसाप्प सुतारास पश्चात्ताप झाला. तो त्याच्या स्वतःच्याच तोंडात मारून घेऊ लागला. त्याने श्री स्वामी समर्थांच्या पायावर डोके ठेवून खूप विनवणी केली. पण श्री स्वामी महाराज त्यावेळी त्याचे घरी परत गेलेच नाहीत.
भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थांनी नरसाप्पा सुताराच्या घरी रहावे असे त्यास वाटणे साहजिक आहे. पण घर-प्रपंच, शेतीवाडीत अडकलेल्या त्या जीवाला सुगीच्या दिवसांत श्री स्वामींचे त्याच्या घरी राहणे अडचणीचे, नुकसानीचे वाटू लागले. प्रपंचात खोलवर रुतलेल्यांना सुगीच्या दिवसांत शेतातून उत्पन्न मिळणार होते म्हणून प्रत्यक्ष भगवंतही अडचणीचा वाटू लागतो. श्री स्वामी समर्थांसारखे दैवत की प्रपंचातले गुरफटलेपण, इथेच त्याची गल्लत झाली. याचा अर्थ प्रपंच सोडून देव-देव करा, असा नाही ‘प्रपंच नेटका करताना परमेश्वराचा विसर न व्हावा’ इतकेच स्वामी भक्तांनी लक्षात ठेवावे.
स्वामी माझे स्वामी
स्वामींचे आशीर्वाद अंतर्यामी ।।१।।
आई काका-काकी, मामा-मामी
सर्वांना सुखी ठेवीती स्वामी ।।२।।
शेतकरी नरसाप्पा सुतार ।।
नाही ओळखला अवतार ।।३।।
स्वार्थी जास्त कामात मस्त
स्वामींची नाराजी कामात व्यस्त ।।४।।
स्वामी निघाले पहाटे
सुतारास वाईट वाटे ।।५।।
स्वामी दत्तगुरु लक्ष्मी
जीथे कमी तीथे स्वामी ।।६।।
ओळखा भक्तजन स्वामीकृपा
सुखात दुःखात स्वामीकृपा ।।७।।
दूर लोटता अवकृपा
स्वामीनामच जन्मभर
स्वामीकृपा।।८।।
आईवडिल विसरू नका
दत्तगुरु स्वामी विसरू नका ।।९।।
याहो याहो सारे जन
स्वामी वाटती पुण्याचे धन ।।१०।।