सीमा दाते
दरवर्षी मुंबईत पावसाळा आणि खड्डे हे समीकरण ठरलेलेच आहे. सध्या खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मुंबई महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या गेल्या तरी पुन्हा पुन्हा खड्डे पडले जातात. दरवर्षी कोट्यवधी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केले जातात मात्र तरीही मुंबईतील रस्त्यांवर खड्डे आहेतच.
गेली ३० वर्षे ज्यांची सत्ता मुंबई महापालिकेत आहे ते अद्यापही मुंबईकरांना चांगले रस्ते देऊ शकले नाहीत. तर आता मुंबई महापालिकेने मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी नवीन उपाययोजना केली आहे, मात्र खरंच यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल का, हा प्रश्न अनुउत्तरीत आहेच. काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात होणारे खड्डे भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने आधुनिक अभियांत्रिकी पद्धतीचा वापर करत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे प्रात्यक्षिक केले होते, याबाबत पालिकेचे कौतुक आहेच मात्र खरंच मुंबई खड्डेमुक्त होईल का? यात एकूण चार प्रकारच्या या पद्धती असून त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे. या चार पद्धतींपैकी ज्या पद्धती यशस्वितेच्या निकषावर उतरतील, त्यांचा अवलंब महानगरपालिका करणार आहे.
हा पद्धतीत रॅपिड हार्डिंग काँक्रीट, एम ६० काँक्रीट भरून त्यावर स्टील प्लेट अंथरणे, जिओ पॉलिमर काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉक या चार पद्धतींचा प्रायोगिक तत्त्वावर उपयोग करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मुंबईतील विविध रस्त्यांवर ही प्रात्यक्षिक घेण्यात आली होती. तर पूर्व मुक्त मार्गाच्या खाली दयाशंकर चौक, मुंबई पोर्ट ट्रस्टचा रस्ता तसेच आणिक-वडाळा मार्गावर भक्ती पार्क जंक्शन, अजमेरा जंक्शन या ठिकाणी ही प्रात्यक्षिके करण्यात आली.
यात जिओ पॉलिमर काँक्रिट पद्धतीचा वापर सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने करण्यात येतो. सिमेंट काँक्रीटचा रस्ता खराब झाला असेल तर संपूर्ण पृष्ठभाग न काढता खड्ड्यामध्ये जिओ पॉलिमर काँक्रीट भरले जाते आणि ते मूळ सिमेंट काँक्रिट समवेत एकजीव होते. विशेष म्हणजे या पद्धतीने खड्डे भरल्यानंतर अवघ्या २ तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येऊ शकतो. त्यानंतर पेव्हर ब्लॉक पद्धतीने खड्डे भरताना भर पावसातही खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक भरून दुरुस्ती करता येते. पेव्हर ब्लॉक एकमेकांमध्ये सांधले जात असल्याने आणि ब्लॉक भरताना खड्ड्यांमध्ये समतल जागा करून ब्लॉक अंथरण्यात येत असल्याने खड्डा योग्यरितीने भरतो आणि वाहतूक सुरळीत करता येते.
तर रॅपीड हार्डनिंग सिमेंट पद्धतीमध्ये विशिष्ट प्रकारचे सिमेंट खड्ड्यांमध्ये भरले जाते. सुमारे ६ तासांत सिमेंट मजबूत होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होते व एम-६० काँक्रीट पद्धतीमध्ये या प्रकारचे काँक्रीट मजबूत होण्यासाठी सुमारे ६ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, मुंबईसारख्या महानगरात इतका वेळ रस्ता वाहतुकीसाठी बंद राखणे शक्य नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून खड्ड्यांमध्ये एम-६० काँक्रीट भरल्यानंतर त्यावर अतिशय मजबूत अशी पोलादी फळी (स्टील प्लेट) अंथरण्यात येणार आहे. त्यामुळे खड्डेही भरले जातील आणि वाहतुकीसाठी रस्तादेखील लागलीच खुला करणे शक्य होणार आहे. अशा चार पद्धतीचे प्रात्यक्षिक करण्यात आले असून यातील योग्य पद्धत पुढील काळात मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणार आहे.
महापालिका नेहमीच मुंबईकरांसाठी सुखकर सोयी-सुविधा देत असते. मात्र मुंबईतील रस्त्यांच्या बाबतीत महापालिका दरवर्षी मागे पडते. मुंबईत थोडाही पाऊस सुरू झाला, पाणी साचले तरी रस्ते खड्डेमय होतात. दर पावसाळ्यात मुंबईची ही अवस्था होतच असते, त्यात मुंबईकर त्रास सहन करत आपल्या नोकरीपरंत पोहोचत असतो. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा ही सामना करावा लागत असतो, मात्र आता महापालिकेने या पद्धतिचे प्रात्यक्षिक केले आहे. त्यामुळे नक्की रस्ते खड्डे मुक्त होणार का हा प्रश्न आहेच पण इतक्या उशिरा का या तांत्रिक पद्धतीचा वापर केला जातो आहे. या आधी पालिकेने कोल्डमिक्सने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सुरुवात केली होती, सगळ्याच्या नगरसेवकांनी विरोध केला असला तरी कोल्डमिक्सनेच खड्डे बुजवले जात होते. परिणाम थोड्याशाही पावसात पुन्हा खड्डे पडायला सुरुवात व्हायचे. मात्र आता या आधुनिक पद्धतीमुळे मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळतील का हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल.