Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीपावसात फिरा... पण जरा जपून

पावसात फिरा… पण जरा जपून

अनघा निकम-मगदूम

गेल्या काही लेखामध्ये कोकणातील निसर्ग आणि त्याच्याशी जुळवून घेणारे लोकजीवन याविषयी प्रामुख्याने लिखाण होतेय. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. पावसाळी वारे वाहू लागले आणि इथल्या निसर्गाने कूस बदलली, त्याप्रमाणे शब्दांनीही आपला मोर्चा इथल्या निसर्ग जीवनाकडे वळवला असेच म्हटले पाहिजे. कोकण अंगोपांगी बहरते ते पावसाळ्यातच! प्रत्येक पानातून टपकणारा पाऊस थेंब, अंगणात साचणारे तळे, उधाणलेला समुद्र, झुळझुळ वाहणारे झरे, नद्या यांचे वैभव याच दिवसात दिसते आणि याच दिवसात इथल्या डोंगर कपारीतून अखंड कोसळणारे धबधबे हे तर पावसाळी कोकणातलं खास वैभव!

गेले महिनाभर इथे मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे आपसूकच कडेकपारी, डोंगरातून अनेक ठिकाणी छोटे-मोठे पावसाळी धबधबे निर्माण झाले असून तरुणाईची पावले त्याचा आनंद लुटण्यासाठी तिथे वळूसुद्धा लागली आहे. अगदी मुंबई-गोवा महामार्गवरून जरी या दिवसात फेरी मारली तरी अनेक ठिकाणी हे धबाबा कोसळणारे धबधबे खुणावत असतातच. त्यातीलच आंबोली, मार्लेश्वर असे काही धबधबे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी पावसाळी पर्यटन सुद्धा उत्तम पद्धतीने चालते. त्यातून रोजगारसुद्धा उपलब्ध होतो. पण पर्यटन म्हटले की जसा त्यातून आनंद मिळतो, तशीच त्याची दुसरी त्रासदायक बाजू आहेच. हौशी म्हणवून घेणारे पर्यटक अशा ठिकाणचे पावित्र्य, सार्वजनिकता याचा भंग करून एखाद्या ठिकाणाला आपल्या वागण्यामुळे बदनाम करतात. अशा वेळी या ठिकाणाचा आनंद लुटण्यासाठी येणारे मध्यमवर्गीय मात्र यापासून लांब राहणेच पसंत करतात. यातून एखादे ठिकाण अशा पद्धतीने बदनाम झाले, तर त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावरसुद्धा होताना दिसतो. अशा वेळी पोलिसांसारख्या यंत्रणाकडून अपेक्षा व्यक्त केली जाते; परंतु समाजात वावरताना आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे भान प्रत्येकाने जपले, तर अशा गोष्टी बंद करणे अधिक सोप्या होत असतात.

एकिकडे प्रसिद्ध पर्यटन स्थळावर अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतात, तर दुसरीकडे धाडसी पर्यटनाच्या नावाखाली जीवाशी खेळणारे हौशीसुद्धा पाहायला मिळतात. पावसाळ्यात कोकणामध्ये अनेक ठिकाणी धबधबे दिसतात. उंचावरून पडणारे पाणी नेहमीच आकर्षित करत असते. त्यामुळे जंगलभागात किंवा या परिसराची फारशी माहिती नाही. तिथेही अनेकजण थांबलेले पाहायला मिळतात.

वास्तविक याच काळात दरडी कोसळणे, माती वाहून जाणे, पाण्याचे लोंढे अचानक येथून पाण्याची पातळी वाढणे हे प्रकार घडत असतात. ज्या ठिकणाची माहिती असते, तिथे धोके आणि सुरक्षितात याबद्दलही माहिती उपलब्ध असतेच; परंतु अनवट, अपरिचित ठिकाणे नेहमीच धोक्याची शक्यता अधिक ठळक करत असतात. यातून अनेक अप्रिय घटना घडून गेलेल्या आहेत. त्यामुळेच नेहमीच पर्यटनासाठी बाहेर पडताना, विशेषतः पावसाळ्यात कोकणात फिरताना खबरदारी घेणे आवश्यकच असते.

अशा वेळी पर्यटन विकास महामंडळाने किंवा स्थानिक गावातील यंत्रणांनी याबाबत जागरूकता केली. त्यांच्या त्यांच्या परिसरातील असे धबधबे, पावसाळी पर्यटन याबाबत अधिक जागरूकता आणलीम तर पर्यटकांना नवनवी स्थळे पाहायला मिळतीलच; परंतु त्यांची सुरक्षिततासुद्धा कायम राहील. त्याच वेळी स्थानिक प्रशासनाला किंवा स्थानिकांना पावसाळ्यात सुद्धा रोजगार उपलब्ध होईल.

पावसाळ्यात ताजेतवाने झालेल्या कोकणात या दिवसात भेट देणे आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेणे हा अनुभवच स्वर्गीय असतो. फक्त अशा वेळी सावधानता, सुरक्षितता हे सांभाळले पाहिजे आणि कोकणवासीयांनीही केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर पावसाळ्यातसुद्धा ‘येवा कोकण अापलोच आसा’ असे म्हणण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -