अॅड. रिया करंजकर
देशाची प्रगती ही देशात असलेल्या अनेक उद्योगधंद्यांमुळे होते आणि या उद्योगधंद्यांना प्रगतिपथावर आणण्याचे काम त्या उद्योगधंद्यामध्ये कार्यरत असलेला कामगार करत असतो. याचाच अर्थ देशाची प्रगती ही देशातल्या नागरिकांवर आणि कामगारांवर अवलंबून असते. ज्या देशाचा कामगार आळशी, अप्रामाणिक असेल, त्या देशाची प्रगती कधीही होत नाही. अनेक देशांमध्ये आपले स्वतःचे असे वेगळे कामगार कायदे लागू केलेले आहेत आणि प्रत्येक उद्योगधंद्यातील मालक आपला कामगार कसा खूश राहील व आपल्याला त्याच्याकडून कसं उत्पन्न मिळेल याकडे जास्तीत जास्त लक्ष देत असतो. कामगार जर सुखी असेल, तर त्या मालकाच्या उद्योगधंद्याची प्रगती होते.
प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये अनेक कामगार असतात आणि अनेक कामगारांना अनेक समस्या असतात आणि या कामगारांमध्ये एकजूट निर्माण होण्यासाठी अनेक कामगार युनियन संस्था स्थापन झालेली आहे. जे कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असतात. काही कामगार युनियन अशा आहेत की, ज्यामुळे कामगार रसातळाला पोहोचलेले आहेत.
माथाडी कामगार म्हणजे कष्टकरी वर्ग आणि मुंबई शहरांमध्ये जास्त प्रमाणात माथाडी कामगार आहेत. या माथाडी कामगारांना अनेक प्रकारच्या सुखसोई शासनामार्फत मिळतातही. या माथाडी कामगारांच्या प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या कामगार युनियन आहेत. अशाच प्रकारे हे प्रश्न सोडवण्यासाठी चार माथाडी कामगार एकत्र आले व त्यांनी कामगार युनियनची स्थापना केली. युनियन म्हणजे अनेक सदस्यांची नावे त्यामध्ये असायला हवीत. पण यांच्या युनियनमध्ये हे चारच जण प्रमुख होते. या चार जणांनाच महत्त्व दिले जात होते. बाकीच्या लोकांना कुठल्याही प्रकारचं महत्त्व दिलं जात नव्हतं. या चारजणांनी एका कंपनीमध्ये जाऊन त्यांच्या मॅनेजरला अशी धमकी दिली की, आमची माणसं तुमच्या इथे कामाला ठेवा. दोघांना सुपरवायझर व बाकीच्या दोन व्यक्तींना मजूर म्हणून व हेल्पर अशा स्वरूपाची कामे देण्यात यावी, तरच आम्ही तुमच्या कंपनीचे काम चालू देऊ व प्रत्येक गाडीमागे आम्हाला दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम देणे तुम्हाला गरजेचे आहे, अशी धमकी या लोकांनी त्या कंपनीच्या मॅनेजरला दिली. त्यावेळी कंपनीच्या मॅनेजरने आमचे साहेब मीटिंगसाठी बाहेरच्या शहरात गेले आहेत ते आल्यावर आम्ही बोलतो व आपला संपर्क करतो, अशा प्रकारे त्या दिवशी त्यांनी परिस्थिती निभवून नेली. कसं बसं त्या युनियन लीडरला त्यांनी समजावले. परत काही दिवसांनी त्या युनियनमधील एक प्रमुख व्यक्ती परत त्या मॅनेजरला धमकावून गेला व संपूर्ण स्टाफचे कामकाज खोळंबून जाईल, अशा प्रकारचा दंगा त्यांनी कंपनीत केला. काही दिवसांनंतर कंपनीचे मालक जे मीटिंगसाठी बाहेरच्या शहरात गेलेले होते ते आल्यानंतर सदरील घडलेला प्रकार कंपनीच्या मॅनेजरने कंपनीच्या मालकाच्या कानावर घातला. मालकाच्या लक्षात आले की, ही साधीसुधी गोष्ट नाही. त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या लोकांना बोलवून चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांच्या तपासामध्ये असे दिसून आले की, हे जे चार युनियनची लोकं आहेत, त्यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये दंगा वगैरे करून बेकायदेशीररीत्या कामे व हप्ते गोळा केलेले आहेत व त्या ठिकाणच्या कामावरती असलेल्या मजुरांना काम करू देत नाही व या कामगारांच्या वाटणीचे पगार घेतात. त्यामुळे पोलिसांनी या व्यक्तींना धमकी देणे, जबरदस्तीने एखाद्या ठिकाणी जाणे, अशा प्रकारचे गुन्हे लावून अटक केली. सदर प्रकरणाबद्दल न्याय निवाडा हा न्यायालयात चालू आहे.
कामगार युनियन ही कामगारांच्या भल्यासाठी स्थापन केलेली एक संस्था असते. पण काही कामगार युनियनमधले लीडर असे असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी व झटपट श्रीमंत होण्यासाठी आपल्याच कामगार बांधवांचा विश्वासघात करतात व कामगार युनियनचे लीडर आहोत म्हणजे आपण सर्वस्व आहोत, असे समजून लोकांना धमकी देणे, बळजबरीने लोकांच्या उद्योगधंद्यामध्ये घुसणे, अशी कामे हे लीडर करतात. खरंच त्यांचा कामगार कायद्याचा पूर्ण अभ्यास असतो का?…आणि अशा स्वार्थी युनियन लीडर्समुळेच कामगार हा देशोधडीला लागलेला आहे.
(सत्य घटनेवर आधारित)