सतीश पाटणकर
पाऊस जोरदार पडत असताना आता सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची रिघ धबधब्यांकडे लागली आहे. पावसाळी पिकनिक्ससाठी सिंधुदुर्गातल्या धबधब्यांचं आकर्षण दिवसेंदिवस वाढतंय. ठिकठिकाणचे धबधबे आता जोमाने वाहू लागले आहेत. सिंधुदुर्गाच्या सरहद्दीनजीक वैभववाडी तालुक्यातला नापणे धबधबा, आंबोली, मांगेलीचे धबधबे, देवगड शिरगावचा सैतावडा धबधबा, देवगड मणचेचा व्याघ्रेश्वर धबधबा, सावडावचा धबधबा हे धबधबे पर्यटकांना खुणावताहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन सौंदर्यात भर घालणारे रम्य समुद्रकिनारे… बुलंद किल्ले, त्याचबरोबर पिकनिकचा आनंद द्विगुणित करणारे लहान-मोठे धबधबे हे जिल्ह्याचे वैभव आहे. आषाढी एकादशीचा मुहूर्त पकडत पावसाने धुवांधार बरसण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांसह पर्यटकही सुखावले आहेत. या संततधार पावसामुळे राजापूर शहर आणि परिसरातील धबधबे डोंगर कड्यावरून ओसंडून वाहू लागले आहेत. राजापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिर परिसरातील कोटीतीर्थ धबधबा पांढऱ्या शुभ्र जलधारांनी ओसंडून वाहू लागला आहे. निसर्गरम्य परिसर, श्री धूतपापेश्वर मंदिर, श्री दत्तमंदिर अशा रमणीय स्थळी असणारा हा धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. त्याचबरोबर शहर आणि तालुका परिसरातील हर्डी-तिथवली येथील कातळकडा धबधबा, चुनाकोळवण येथील सवतकडा धबधबा, हातणकरवाडी येथील पाषाणकट्टा धबधबा, चौके म्हाळुंगे येथील लांबोडा, चौकडा धबधबा शतजलधारांनी कोसळू लागले आहेत. ऐन पावसात या ठिकाणांना भेट देणे हा एक अवर्णनीय आनंद असतो.
निसर्गाच्या सान्निध्यात घालविलेले काही निवांत क्षण आपले अस्तित्वच ताजेतवाने करून सोडतात, याची अनुभूती या धबधब्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही. गेले तीन ते चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील वर्षा पर्यटनाला गती मिळाली आहे. वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विविध ठिकाणच्या धबधब्यांकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. अशातच रविवारच्या हक्काच्या सुटीनिमित्त हजारो पर्यटकांनी धबधब्यांखाली भिजत ‘वीकेण्ड’ ओलाचिंब केला. पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर वर्षा पर्यटन स्थळांवर गर्दी होत असल्याने गेले वर्षभर पावसाळी पर्यटनातून चार पैसे कमावणाऱ्या संबंधित व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण तळेरे दरम्यानच्या वारगावपासून नजीक असलेला नापणे धबधबा असून धबधब्याच्या वरच्या बाजूस नाधवडे तिथे महादेवाचे मंदिर आहे. त्या नजीक दगड कपारीतून पाण्याचा प्रवाह वर येतो. तीच ही नदी पुढे नापणे धबधब्यापर्यंत जाते. धबधब्याच्या खाली मोठा डोह असून तो खूप खोल आहे. हा धबधबा फक्त कड्यावरून पाहावा लागतो. डोह धोकादायक असल्याने कोणी या डोहात आंघोळीसाठी जात नाहीत. मुख्य धबधबा ६ फूट उंचीचा आहे. धबधब्यापर्यंत डांबरी सडक आहे. गगनबावडा-करुळ घाटातून खाली उतरून आल्यानंतर वैभववाडीपासून नजीक असलेल्या धबधब्यावर पर्यटकांची बारमाही वर्दळ असते.
तळेरेपासून पुढे गेल्यानंतर कणकवलीच्या १६ किमी अलीकडे सावडावचा धबधबा आहे. महामार्गावरून हे अंतर ५ किमी आहे. या विस्तीर्ण धबधब्याचे राजा आणि राणी असे दोन भाग आहेत. आंबोली हे थंड हवेचं ठिकाण. दर वर्षी पर्यटकांची झुंबड असणाऱ्या आंबोली घाटातल्या मुख्य धबधब्यासह लहान-मोठ्या अन्य धबधब्यांखाली पर्यटक यथेच्छ डुंबत असतात. गेल्या वर्षापासून घाटाची मोठ्या प्रमाणावर पडझड होत असल्याने सावंतवाडीतून जाणाऱ्या पर्यटकांना आता या धबधब्याकडे जाता येत नाही. दोडा मार्गाजवळ असलेला, भेडशीनजीक असलेल्या मांगेली धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावलं वळत आहेत. मांगेली फणसवाडीतले धबधबे आता जोमाने वाहू लागले आहेत. सिंधुदुर्ग कर्नाटकाच्या सीमेवर असलेला मांगेलीचा धबधबा तसा दुर्लक्षितच. मात्र कर्नाटक, गोवा सीमेजवळील पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. येतील निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकते. गर्द वनराईतील हा धबधबा दोडामार्गाहून ३० किमीवर आहे. मुंबई-गोवा महामार्गाजवळील बांदा इथून दोडामार्गला ४० किमी अंतर कापून जावे लागते. मांगेली गावापर्यंत एसटी बस जाते. मात्र गावातून धबधब्यावर चालत जावे लागते. हा धबधबा चालत जाऊन पाहण्यातच खरी मजा आहे. कर्नाटक सरहद्दीनजीक असलेल्या या धबधब्यांची मोठी रांग उंचच उंच कड्यावरून कोसळताना पाहून भान हरपून जातं.
सावंतवाडी तालुक्यातल्या सासोली इथेही धबधबा आहे. भुईबावडा-करुळ या घाटामध्येही आता अपारंपरिक धबधबे तयार झाले असून घाटाच्या उंच कड्यावरून कोसळणारे विलोभनीय धबधबे पर्यटकांना मोहित करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेले आंबोलीची प्रति महाबळेश्वर म्हणूनही राज्यात वेगळी ओळख आहे. दर वर्षी पावसाळ्यात आंबोली येथील वर्षा पर्यटनाला मोठा प्रतिसाद मिळतो. नैसर्गिक साधन सामग्रीने नटलेल्या व विपुल वन्यजीव संपदा लाभलेला आंबोलीतील मुख्य धबधबा आता प्रवाहित झाला असून, शनिवारी, रविवारी हजारो पर्यटक वर्षा पर्यटनानिमित आंबोलीला भेट देत आहेत. आंबोलीतील या वर्षीच्या वर्षा पर्यटन हंगामाला दमदार सुरुवात झाली आहे. कोकणात मान्सूनची जोरदार सुरुवात झाल्यानंतर आंबोलीतील प्रसिद्ध वर्षा पर्यटन आता सुरू झाले आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे आंबोलीतील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाने आंबोलीवर मुक्तहस्ताने उधळण केली आहे. दऱ्या-खोऱ्या, उंच डोंगर-कडे-कपारे तसेच नैसर्गिक सौंदर्याने, विपुल वन्यजीव संपदासोबत थंड हवा, भरपूर पाऊस, दाट धुके, सतत बदलत असणारे हवामान यामुळे पावसाळ्यात येथील वातावरण स्वर्गाहून अधिक अनुभूती देणारे ठरते. या वर्षी आंबोली मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्यामुळे आंबोलीचे वर्षा पर्यटन बहरले आहे.
पहिल्याच शनिवारी रविवारी वीकेंडला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक राज्यातून दर वर्षी लाखोंच्या संख्येने आंबोली येथे पर्यटक भेट देतात. आंबोलीतील उंच डोंगरावरून कोसळणारा पांढरा शुभ्र मुख्य धबधबा हा येथील प्रमुख आकर्षण आहे. त्याच्याबरोबर प्रसिद्ध कावळेसाद पॉइंटदेखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे. या रविवारी आंबोलीत दाखल झालेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चार अधिकारी, चाळीस पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदी तैनात करण्यात आले आहेत. आल्हाददायक गारवा… धुक्याची सुखद शाल, गार गार वारा… झिम्मड पाऊस आणि धबधब्याच्या फेसाळत्या पाण्याखाली तिथे मनसोक्त डुंबणं यासारखं सुख नाही हेच खरं.