Tuesday, October 8, 2024
Homeमहत्वाची बातमीयंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात

यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात

मुख्यमंत्र्यांची दिलासादायक घोषणा

सर्व सणांवरील निर्बंध हटवले, गणेश मूर्तीवरील उंचीची मर्यादा हटवली

मुंबई : यंदा दहीहंडी, गणेशोत्सव तसेच मोहरम धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सर्व सणांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. गणेशोत्सव साजरी करताना आगमनाच्या आधी रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र असे मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्सव साजरे करण्यावर मागील दोन वर्षे मर्यादा आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या उत्सवांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने यावर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम, नवरात्र आदी सर्व सण आणि उत्सव धुमधडाक्यात साजरे होणार आहे.

गणेशोत्सव आणि दहीहंडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज अतिशय महत्वाची बैठक झाली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण उत्सवांवर मर्यादा होत्या. निर्बंध होते. इच्छा असूनही उत्सव साजरे करता आले नाहीत. यावर्षी मात्र सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षांतील मर्यादा पाहता यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्साहात साजरे झाले पाहिजेत, असा कल दिसून आला. त्यामुळे यावर्षी सर्व उत्सव निर्बंधांविना साजरे होतील. कायदा सुव्यवस्था राखून सण साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

गणेशोत्सवापूर्वी सर्व मार्गांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडपांच्या परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत. यासाठी एक खिडकी योजना, ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांना नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. कोरोनामुळे उंचीवर मर्यादा घालण्यात आली होती. मात्र ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. या सणानिमित्त लोक आपापल्या गावी जातात. अशा चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एसटी प्रशासनाला कोकणात जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच २१४ विशेष रेल्वे गाड्याही चालवल्या जाणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -