हरिनामाच्या गजरात सोलापूर दुमदुमले

Share

सोलापूर (प्रतिनिधी) : पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात सोमवारी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले. माऊलींच्या पालखीचे सकाळी ११.३०च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले.

चला पंढरीसी जाऊं।
रखमुमादेविवरा पाहू॥
डोळे निवतील कान।
मना तेथे समाधान ॥
संता महंता होतील भेटी।
आनंदे नाचो वाळवंटी॥

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने, हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हा प्रवेश झाला. पालखी आगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कला पथकाद्वारे आरोग्यविषयक विविध योजनांची वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे म्हणून वेंडर मशीन विसावा ठिकाणी बसविली आहे. त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारीमध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी यात्रा २०२२ या सोलापूर जिल्हा माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांनी टाळ हाती धरून हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर विसाव्यापर्यंत पायी चालले. तत्पूर्वी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जि. प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

कारुंडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा व विद्युतपुरवठा आदी सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जि. परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जि. पो. अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पो. अधीक्षक हिंमत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

4 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

5 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

5 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

6 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

7 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

7 hours ago