Thursday, April 24, 2025
Homeअध्यात्मसाईनाथांचा जीवन संदेश

साईनाथांचा जीवन संदेश

एकदा साईनाथांनी वांद्र्याच्या बाळाराम मानकरांना तपकरायला एकदा मच्छिंद्रगडावर पाठविले. त्यांनी तेथे वास्तव्य करून अविरत तपाचरण केले. ते ध्यानमग्न अवस्थेत असताना श्रीबाबांनी त्यांना अनेकदा दर्शन दिले असता त्यांनी विचारले, “बाबा, तुम्ही मला या ठिकाणी का पाठविले?’’ ते म्हणाले, “शिर्डीत असताना तुझे मन अशांत होते. ते शांत करण्यासाठीच मी तुला येथे पाठविले आहे. मनशांतीशिवाय आत्मसुख लाभत नाही.’’ ते ऐकून मानकरांना मोठे समाधान वाटले. पुढील काळात श्रीबाबांच्या कृपाप्रसादाने मानकरांना आत्मसाक्षात्कार झाला.

अशा प्रकारे श्रीबाबांच्या मार्गदर्शनानुसार आपली साधना पूर्ण करून ते मच्छिंद्रगडावरून वांद्र्याला जाण्यास निघाले. पुणे स्टेशनवर येताच ते तिकीट खिडकीपाशी गेले. तेवढ्यात एक कुणबी मनुष्य त्याच्यापाशी आला व म्हणाला, “तुम्ही कोठे निघाला आहात?’’ मानकरांनी ते दादरला जाणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “मीही दादरलाच निघालो होतो, पण महत्त्वाचे काम आठवल्यामुळे माझे जाणे रद्द झाले आहे. तरी माझ्या तिकीटावर तुम्ही प्रवास करा.’’ बोलता बोलता त्याने ते तिकीट मानकारांच्या हातावर ठेवले आणि तो गर्दीत दिसेनासा झाला. तिकीटाचे पैसे देण्यासाठी त्यांनी त्याला खूप शोधले; परंतु तो दिसलाच नाही. बाबांचे गडावर होणारे दर्शन आणि त्यांनी पुणे स्टेशनवर कुणब्याच्या रूपात येऊन दिलेले तिकीट या घटना मानकर कधीही विसरले नाही.

मानकारांना सतत बाबांचाच ओढा होता. त्यामुळे वांद्रयाला येऊनही त्यांचे मन रमेना. ते पुन्हा शिर्डीतच येऊन राहिले. कालांतराने त्यांनीही श्रीबाबांच्या चरणी देह ठेवला व साईभक्त म्हणून जगप्रसिद्ध झाले.

सहज बोलणे सहज उपदेश ।
ऐसे वर्तन होते खास ।।१।।
काया मानवी तरी प्रत्यक्ष ।
परमेश्वर ते जाणावे।।२।।
श्रीसाईंच्या लीला अनंत।
अगाध आणि अति अद्भुत।।३।।
श्रवण पठणे मोद अत्यंत।
अवघा गोड विस्तार ।।४।।
कृपासिद्ध ते महासंत।
अवतार लोकोपकारार्थ।।५।।
कित्येक वर्षे अविरत ।
भक्तकार्य चालविले ।।६।।
कित्येकांसी उपदेशिले ।
कित्येकांसी संकटी रक्षिले।।७।।
कित्येकांसी अभय दिधले।
केले सुखी भक्तजनां ।।८।।
दुःखितांचे अश्रू पुसले।
व्याधिग्रस्तां बरे केले।।९।।
अनेकांसी सन्मार्गी लावले।
उद्धरिले कित्येकां।।१०।।
केवळ उपकारास्तव जन्म।
केले अव्याहत जनकल्याण।।११।।
साई सर्वांची ‘आई’ होऊन।
राहिले शिर्डी ग्रामात ।।१२।।
श्रीसाईंचे वास्तव्य म्हणून ।
क्षेत्र जाहले परमपावन।।१३।।
एक सिद्धपीठ म्हणून।
प्रसिद्ध भारत वर्षात।।१४।।

विलास खानोलकर
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -