संतोष वायंगणकर
महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस फार वेगवान घडामोडी घडत आहेत. कधी काय घडेल याचा अंदाज बांधणे राजकीय धुरिणांनाही कठीण झालं आहे. महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामिण भागातही पुढे काय होईल, कोणाचं बरोबर आहे, कोण चुकतंय? याचे आडाखे बांधत सगळेच चर्चा करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्यजन एक गोष्ट बोलतोय, शिवसेनेने महाआघाडीसोबत जाण्याने फार मोठी चूक झालीय. त्याचेच हे समोर आलेले परिणाम आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदर बाळगणारे महाराष्ट्रामध्ये लाखो लोक आहेत. ज्यांचा राजकारणाशी आणि शिवसेनेशी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या लाखोंच्या मनात आजही आणि भविष्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी अस्मितेचे प्रतिक मानले जातात. याच भावनेतून महाराष्ट्रातील शिवसेनेशी जोडला गेलेला सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वलयाभोवती नेहमीच नतमस्तक असतो.
१९६६ साली ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन झाली. त्यानंतर काहीही असेल; परंतु शिवसेना बदलत गेली. १९९५ मध्ये सत्तेची चटक लागलेली शिवसेना पार बदलली. सत्तेवर येण्यापूर्वीची शिवसेनेची ध्येयधोरणे समाजकारणाशी निगडित होती. त्यात फक्त मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेपुरताच राजकारणाचा सहभाग होता. हा नावापुरताच सहभाग होता. रक्तदान, शैक्षणिक साहित्य वाटप, कोणत्याही ठिकाणी येणाऱ्या संकटात शिवसैनिक सामाजिक जाणिवेने उभा असायचा. शिवसेनेच्या लोकाधिकार समितीच्या माध्यमातून सुधीर जोशी, गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकारातून तरुणांना नोकरीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाली हे कोणीही नाकारणार नाही. शिवसेनेच्या या साऱ्या वाटचालीत केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच कार्य, कर्तृत्व कुणाला नाकारता येणार नाही. कोकणात शिवसेना नारायण राणे यांच्या नेतृत्वानेच रुजवली. हे वास्तव कुणाला नाकारता येणार नाही.
गेल्या पंधरा-वीस वर्षांत मूळ शिवसैनिक बाजूलाच पडला. याचे कारण काँग्रेसी विचारांच्या अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पंचवीस वर्षांपूर्वी मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रा. वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, लिलाधर डाके, शरद आचार्य, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, नारायण राणे असे शिवसेनेच्या विचारांची बैठक असलेले नेते होते. यातल्या अनेकांच्या प्रभावी वक्तव्याचे गारुड मराठी तरुणांच्या मनावर होते. विचारात आणि वक्तव्यात एवढी धार होती की, काहीही करायची तयारी असलेला तरुण आपोआपच शिवसेना या चार अक्षरांशी जोडला गेला; परंतु नंतरच्या काळात पक्षप्रमुख झालेल्या उद्धव ठाकरे यांचे दरबारी राजकारण सुरू झाले. ज्या कोकणाने नेहमी शिवसेनेला पाठबळ दिलं, त्या कोकणाला शिवसेनेने काय दिलं? वेगळे प्रकल्प, वेगळा निधी यातले काहीही दिलेले नाही.
कोकणात दोन वगळता बाकी सगळे आमदार शिवसेनेचे निवडून आले; परंतु गेल्या अडीच वर्षांत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेने कोकणाला काहीही दिलेले नाही. मंजूर झालेल्या प्रस्तावांची जाहीरात केली जायची. एखाद्या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुर करणे आणि प्रत्यक्षात निधी मंजुर करणे, निधीची तरतूद करणे या दोन वेगळ्या पातळीवरच्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रस्ताव मंजूर; परंतु आर्थिक तरतूद कोणत्याही प्रकल्पाला नाही. प्रकल्प मंजुरीचे प्रस्ताव २५-३० वर्षे धूळ खात पडलेले दिसतात. त्यामुळे कोकणाच्या बाबतीत शिवसेनेने अन्यायच चालविला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे परिणाम कोकणावरही झाले आहेत. रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार उदय सामंत आणि माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. कोकणात शिवसेनेची यापुढच्या काळातही अधिक स्थिती बिकट होईल.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे पाहत असताना शिवसेनेचे सर्व निर्णय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यानुसार घेतले जात आहेत. हे आता लपून राहिलेले नाही. ते उघड आहे आणि गेल्या काही दिवसांत ते सर्वसामान्य शिवसैनिकांसमोरही आले आहे. स्वतंत्र विचाराने चालणारी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला बांधली गेली आहे, हे सांगण्यासाठी कुणाही भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने शासन जीआर काढण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यावरून ही घाई कशासाठी आहे, यामध्ये नेमक कोणाच हित आहे, हेही उभा महाराष्ट्र पाहतोय. यामुळेच सामान्य शिवसैनिक अस्वस्थ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेला शिवसैनिक आताच्या शिवसेनेतील नेते आणि त्यांच्या वक्तव्यानेही व्यथित होतो आहे. शिवसेनेच्या बंड केलेल्या आमदारांनी जर त्यांना न पटणाऱ्या गोष्टी समोर आणल्या असतील, तर शिवसैनिक म्हणून त्यांचे काय गैर आहे. वारंवार त्यावर सांगूनही जर महाविकास आघाडीला चिकटून राहण्याचाच निर्णय घेतला जात असेल, तर तो शिवसेनेसाठी धोक्याचीच घंटा होती. ती शेवटी वाजलीच. भावनेच्या आधारावर आणि चुकीची माणसे सोबत घेऊन कुणालाच दीर्घ काळ राजकारण करता येत नाही, करता येणारही नाही, हे लक्षात घेतल पाहिजे. शिवसेनेने वास्तव काय आहे, याकडे कानाडोळा केला. अवास्तवतेवर विसंबून चाललेल्या राजकारणाने महाराष्ट्रात शिवसेनेची अडचण झाली, आहे हेच सत्य आहे.