आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला कांस्यपदक

साखळीतील पराभवाचा बदला घेत जपानवर १-० ने केली मात


जकार्ता (वृत्तसंस्था) : आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक जिंकण्यात यश आले आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथे बुधवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जपानचा १-० असा पराभव केला. भारताकडून सामन्यातील एकमेव गोल राज कुमार पालने सामन्याच्या ७व्या मिनिटाला केला.


भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच पकड राखत पहिल्या क्वार्टरच्या ७व्या मिनिटाला गोल केला. यानंतर जपानचा संघ सतत गोल करण्याचा प्रयत्न करत राहिला. मात्र त्यांना गोल करता आला नाही. भारताकडूनही एकही गोल झाला नाही; परंतु त्यांनी अप्रतिम बचाव केला. भारतासाठी राजकुमार पालने विजयी गोल केला. या स्पर्धेत जपानने साखळी फेरीत भारताचा ५-० असा पराभव केला होता. ज्याचा बदला भारतीय संघाने आधी सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात आणि आता कांस्यपदकाच्या सामन्यात जपानचा पराभव करून घेतला आहे.


जेतेपदाचा दावेदार असलेला भारतीय संघ मंगळवारी सुपर-४ च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण कोरियासोबत ४-४ अशा बरोबरीमुळे अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. त्या सामन्यात भारतासाठी विजय आवश्यक होता. आता सुवर्णपदकाचा सामना कोरिया आणि मलेशिया यांच्यात होणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे. भारतीय संघ यजमान असल्याने विश्वचषकासाठी आधीच पात्र ठरला होता.


विशेष म्हणजे नियमित कर्णधार मनप्रीत सिंगसह अनेक वरिष्ठ खेळाडूंशिवाय टीम इंडियाने या स्पर्धेत प्रवेश केला. यंदाच्या स्पर्धेत गतविजेत्या भारताने नवे प्रयोग करत अनेक ज्येष्ठांना विश्रांती देत युवा खेळाडूंना संधी दिली होती. संघाची कमान बिरेंदर लाक्रा यांच्या हाती होती.


भारत गतविजेता


भारतीय हॉकी संघ २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चषक स्पर्धेत मलेशियाचा २-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. त्याआधी, भारताने ७ वेळा अर्थात २०१३, २००७, २००३, १९९४, १९८९, १९८५ आणि १९८२ या हंगामांत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यापैकी भारतीय हॉकी संघाने २०१७, २००७ आणि २००३ मध्ये असे तीनदा जेतेपद पटकावले आहे.


...असा झाला सामना!


भारताने पहिल्या पाच मिनिटांत अनेक स्ट्राइक केले, पण त्यांना यश आले नाही. तदनंतर ७व्या मिनिटाला उत्तम सिंगने उजव्या बाजूने चेंडू राजकुमार पालकडे वळवला व त्याने जपानी गोलरक्षक ताकाशी योशिकावाला चकवून सामन्यातील पहिला व अंतिम विजयी गोल केला. तीन मिनिटांनंतर भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्याचे रूपांतर भारत गोलमध्ये करू शकला नाही.


पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या पाच मिनिटांत जपानने बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु भारताचा बचाव खूपच मजबूत होता. २०व्या मिनिटाला जपानला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले; परंतु भारतीय बचावपटूंनी त्यांचे गोलमध्ये रूपांतर करू दिले नाही. पुढे दोन्ही संघांनी दुसऱ्या क्वार्टरमध्ये अनेक संधी निर्माण केल्या. मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये त्यांना तशी गती राखता आली नाही. ब्रेकनंतर जपानने आक्रमक खेळ करत सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. पण तेव्हाही त्यांना भारतीय बचावफळी भेदता आली नाही.


दरम्यान भारताला आणखी एक गोल करण्याचीही संधी मिळाली होती. पण एस. व्ही. सुनीलच्या पासवर राजकुमार पालचा फटका गोलपोस्टच्या वरच्या बाजूने गेला. ४८व्या मिनिटाला जपानला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले जे गोलमध्ये रूपांतरित होऊ शकले नाहीत. जपानी खेळाडूंनी शेवटच्या दोन क्वार्टरमध्ये जोरदार प्रयत्न केले. पण बिरेंदर लाक्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा बचाव खूपच तगडा होता. अशा प्रकारे भारताने १-० ने जपानला पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख