नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या शास्त्रार्थ सभेत मंगळवारी महंतांमध्येच राडा झालेला पाहायला मिळाला. हनुमान जन्मस्थळ नेमके कोणते, हे ठरविण्यासाठी एक शास्त्रार्थ सभा बोलाविण्यात आली होती. या सभेत महंत सुधीरदास महाराज यांनी गोविंदानंद सरस्वती यांच्यावर माईक (बूम) उगारला. त्यामुळे सभेत राडा झाला. त्यानंतर गोविंदानंद सरस्वती हे संतापले. जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत नाशिक सोडणार नाही, अशी भूमिका गोविंदानंद यांनी घेतली.
नाशकात हनुमान जन्मस्थळावरून सध्या महंतांमध्ये वाद सुरू आहे. हनुमान जन्मस्थळावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात सकाळी पुन्हा वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी महंत अनिकेत देशपांडे यांच्या नाशिक रोड येथील पिठात शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शांततेत बैठक सुरू असताना महंत सुधीरदास महाराज यांनी गोविंदानंद सरस्वती यांच्यावर बूम उगारला आणि वादाला तोंड फुटले.
पोलिसांच्या मध्यस्थीने सभा गुंडाळली…
शास्त्रार्थ सभा प्रचंड गोंधळानंतर पोलिसांनी संपवली असून आता हनुमान जनस्थळाच्या वादाबाबत काय निर्णय होतो याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे. नाशिक येथे शास्त्रार्थ सभेत सुरू असलेला वाद अखेर वादातच संपल्याने या शास्त्रार्थ सभेतून काहीच फलश्रुती मिळाली नसल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे हनुमान जन्मस्थळाबाबतचा तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेली सभा वादळी ठरली.