Wednesday, July 24, 2024

अजब रसायन

डॉ. कांता नलावडे

नितीन गडकरी नाव उच्चारताच डोळ्यांसमोर हसरे, गोजिरे भारदस्त व्यक्तिमत्त्व उभे राहते. नितीनजी म्हणजे खरोखरच एक अजब रसायन आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढीन हा स्थायीभाव ठायीठायी त्यांच्यात करून राहिला आहे. मुंबई ते पुणे एक्स्प्रेस हायवे हे त्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याकडे फक्त इच्छा व्यक्त केली. पण लगेचच नितीनजींनी त्वरित ती अमलात आणली, त्यांच्यामुळे आपण दोन तासांत मुंबईहून पुण्याला पोहोचतो. देशभर त्यांनी रस्त्यांचे जाळे विणून गावागावांना, राज्याराज्यांना सुद्धा जवळ आणले आहे. समयसूचकता, त्या त्या भागात भौगोलिक अभ्यास, त्या त्या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून गावे जोडण्याची काम यांच्यासाठीचा निधी, वेळापत्रक तयार करून मोठ्या कसरतीने पूर्ण केले आहे. या कामाला तोडच नाही.

युवा मोर्चापासून मी नितीनजींना ओळखते. ते प्रदेश अध्यक्ष असताना मी त्यांच्या टीममध्ये उपाध्यक्ष होते, ते जेव्हा विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता होते, तेव्हा मी विधान परिषदेत आमदार होते. त्यावेळी त्यांच्याकडे असणारी सारासार विचार करण्याची सवय, स्पष्टवक्तेपणा, विषयांची जाण मी अनुभवली आहे. त्यांची वाणी ओघवती, आपले मुद्दे ठामपणे मांडणे, बोलण्यात मिश्कीलता ओतप्रोत भरलेली. विरोधकांना चिमटे काढतानाही ते मिश्कीलपणे बोलत. निपक्षपातीपणे विषयाला न्याय देण्याची कला जणू त्यांना उपजतच असावी. त्यांचा लक्षात राहणारा विशेष गुण म्हणजे ते चांगले खवय्ये आहेत. खाण्यासाठी जसा शौक तसाच इतरांनाही खाऊ घालण्याचा शौक त्यांना आहे.

२००९ साली ते प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी ऐनवेळी मला बारामतीला सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभा लढवायला पाठविणे. त्या ठिकाणी त्यांचा माझ्याबद्दलचा विश्वास होता. पक्ष वाढीसाठी योग्य कार्यकर्त्याला सढळ हाताने मदत करणे हा तर त्यांचा पायंडाच अगदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही सतत चौकशी करणे, त्यांचा पगार वाढवून वेळेवर देणे. अगदी केंद्रीय अध्यक्ष असतानासुद्धा तो कायम होता. त्यांच्या केंद्राच्या टीममध्ये मी होते. दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी जेव्हा त्यांचे नाव निश्चित झाले, सर्वांना आनंद झाला; परंतु ऐनवेळी माशी शिंकली आणि त्यांच्याऐवजी राजनाथजी अध्यक्ष झाले. तेव्हा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मी रडताना पाहीले आहे. सामान्यातल्या सामान्यांची कदर करणे त्यांचा धर्म आहे. अजूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. कधीही भेटले तरी ताई कशा आहात? दिल्लीच्या घरी दिल्लीला गेल्यावर मी आवर्जून त्यांना भेटायला जाते. त्यांच्याशी गप्पा मारण्यास एक वेगळेच समाधान असते. ‘राहायची गाडीची ताई सोय आहे का? नाहीतर मला सांगा.’ हे वाक्य त्यांच्या तोंडी कायम कोरलेले. अहंपणा नाही. ते नेहमी सांगतात सत्ता येते जाते आपण कायम सत्तेवर राहणार नसतो. मग गर्व कशाला करायचा. ते कोणत्याही गोष्टीचे भांडवल करत नाहीत. लोकसभेत यांची भाषणेही मी अनेकदा लोकसभेच्या गॅलरीत बसून ऐकले आहेत. विरोधकही बाके वाजवून त्यांना प्रतिसाद देताना मी पाहिलेय.

कोणतही काम अशक्य नाही ही त्यांची धारणा. मनापासून काम करा, प्रयत्न करत रहा, हा उपदेशच सांगून जातो. “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” ही उक्ती नितीनजींना तंतोतंत लागू पडते. आजही कोरोनाच्या काळात नागपूरला केलेले त्यांचे काम त्यांची व्याप्ती अद्वितीय आहे. त्याला तोड नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते, “आहेत बहु होतील बहु; परंतु या सम हा” अशा या भारदस्त कर्तृत्ववान दयावानाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो ही मनोमन प्रार्थना.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -