नवीन पनवेल (वार्ताहर) : अवैध रेतीउपसा करणाऱ्यांवर पनवेल तहसीलने कारवाई करत १० सक्शन पंप, एक बोट नष्ट केली आहे. या कारवाईमुळे अवैध रेतीउपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी कोपरा खाडीत ही कारवाई केली.
तहसीलदार विजय तळेकर यांनी केलेली ही २८वी कारवाई आहे. कोपरा खाडीत कारवाई दरम्यान तळेकर हे महसूल विभागाच्या टीमसह घटनास्थळी हजर होते.
१९ मे रोजी दुपारी ३च्या दरम्यान भरतीच्यावेळी रेती उत्खनन करण्यासाठी आलेल्या सक्शन पंप आणि बोट महसूल पथकाला दिसताचक्षणी तहसीलदारांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. गॅस कटरच्या साहाय्याने हे रबरी सक्शन पंप नष्ट करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार, तीन सर्कल अधिकारी, दोन कोतवाल उपस्थित होते.