Wednesday, April 29, 2026

Desalinate Seawater : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

Desalinate Seawater : समुद्राचे खारे  पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खाऱ्या पाण्याचे रासायनिक प्रक्रिया करून गोड्या पाण्यात रूपांतर करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी निवेदन करीत, केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिल्याबाबतची घोषणा केली. यावेळी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी बाके वाजवून याचे स्वागत केले..

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि दररोज होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि पाण्याची मागणी यातील तफावत दूर करण्यासाठी आणि मुंबईकरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी सत्ताधारी भाजप - शिवसेना महायुतीने साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या गारगाई धरण प्रकल्पाला मंजुरी दिली. तर, या धरण प्रकल्पात लाखो झाडांची कत्तल होणार असून खर्चिक प्रकल्प असल्याने आणि पर्यावरण धोक्यात येणार असल्याचे कारण उबाठाने गारगाई धरण प्रकल्पाला विरोध करीत कमी खर्च असलेल्या समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी लावून धरली होती.

समुद्राचे खारे पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय विभागाने मंजुरी दिली आहे. सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या २० दिवसांत याबाबात मंजुरी मिळाल्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पश्चिम उपनगरातील मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी २०० दशलक्ष लिटर इतके प्रक्रिया करून शुद्ध करून ते पिण्यायोग्य बनविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी २०० दशलक्ष लिटर इतके समुद्राचे खारे पाणी प्रक्रिया करून शुद्ध करण्यात येणार असून त्यामुळे मुंबईसाठी जवळजवळ ४०० दशलक्ष लिटर पाणी समुद्राच्या पाण्यापासून उपलब्ध करण्यात येणार आहे. अर्थात त्यासाठी चार वर्षांचा. कालावधी लागणार आहे. मनोरी येथील प्रकल्पाचा बांधकाम खर्च ४ हजार कोटीवर जाणार असून देखभाल व प्रचालनासह आणि विजेचा खर्च पाहता एकूणच ९७३७ कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

Comments
Add Comment