मुंबई (प्रतिनिधी) : राज्य कला संचालनालयाच्या मार्फत ९ ते ११ एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड या परीक्षेचा निकाल रखडला आहे. या परीक्षेला राज्यात जे विद्यार्थी ऐनवेळी बसले होते, त्यांची नोंदणी आणि इतर माहिती गोळा करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत असल्याने हा निकाल रखडला असल्याचे सांगण्यात येते.
राज्यात सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने शाळा बंद आहेत, त्यामुळे या शाळांतून ऐनवेळी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवणे अवघड होत असल्याने एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड या परीक्षेचा निकाल २० मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य कला संचालनालयाकडून हा निकाल जाहीर करण्यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. त्यातच शाळांकडून निकालपत्रही गोळा करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठीची डेटा इंट्रीची कामेही पूर्ण झाली असून तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती संचानालयाकडून देण्यात आली.
राज्यात यंदा नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एटीडी या अभ्यासक्रमांच्या फाऊंडेशन कोर्ससाठी आवश्यक असलेले विद्यार्थीही परीक्षेला बसले होते. दरम्यान, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यानी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला यामध्ये भाग घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना वाढीव देण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करण्यास शाळांना १५ मेपर्यंत शिक्षण मंडळाने मुदत दिली होती. मात्र चित्रकला परीक्षेचा निकालच रखडला असल्याने मंडळाकडून २ जूनपर्यंत हे प्रस्ताव स्वीकारले जाण्याची शक्यता आहे.