Monday, July 15, 2024
Homeमहामुंबईएसी लोकलला प्रवाशांची पसंती

एसी लोकलला प्रवाशांची पसंती

मध्य रेल्वेवर मे महिन्यात प्रवासी संख्येत दररोज सरासरी २६,८१५ वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी वातानुकूलित उपनगरीय लोकलला चांगला प्रतिसाद दिला आहे. वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी ५,९३९ प्रवाशांवरून मे महिन्यात दररोज सरासरी २६,८१५ प्रवासी इतकी वाढली आहे.

मध्य रेल्वे वातानुकूलित लोकलसह एकूण १८१० उपनगरीय सेवा चालवते, तर १४ एप्रिलपासून मेन लाइनवर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण/टिटवाळा/अंबरनाथ) १२ वातानुकूलित सेवा वाढल्याने मेन लाइनवरील एकूण वातानुकूलित सेवा (आठवड्याच्या दिवशी) ४४ वरून ५६ पर्यंत वाढल्या आहेत. आता टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवासी गर्दीच्या वेळेत (पीक अवर्समध्ये) वातानुकूलित सेवेचाही लाभ घेता येईल. मध्य रेल्वेने रविवारी आणि नामनिर्देशित सुट्टीच्या दिवशी १४ अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर ५ मेपासून रेल्वेने एकेरी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर वातानुकूलित लोकलला मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढला आहे. ३४ किलोमीटर अंतरासाठी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे) प्रति व्यक्ती एका प्रवासाचे भाडे रु. ९५/- आहे आणि ५४ किलोमीटर अंतरासाठी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण) रु. १०५/- आहे.

दरम्यान आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ८,१७१ तिकिटे, डोंबिवली – ७,५३४ तिकिटे, कल्याण – ६,१४८ तिकिटे, ठाणे – ५,८८७ तिकिटे, घाटकोपर – ३,६९८ तिकिटांची विक्री झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -