Monday, December 2, 2024
Homeमहत्वाची बातमीमुख्यमंत्र्यांची भाषा राज्याच्या परंपरेला काळिमा फासणारी

मुख्यमंत्र्यांची भाषा राज्याच्या परंपरेला काळिमा फासणारी

नारायण राणे यांचा जोरदार प्रहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरुणांच्याच नव्हे तर कोणाच्याही हातात दगड देत नाही, विचार देते’, असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर सभेत केलेल्या भाषणाचा राणे यांनी यथेच्छ समाचार घेतला.

‘तुम्ही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलात तरी नारायण राणेंशी बरोबरी करू शकणार नाही. मुंबईला हात लावाल, तर तुकडे करून टाकू… ही तुमची भाषा. तुकडे करू म्हणजे काय? फरसबी, भेंडी वाटली. त्यासाठी असावे जातीचे…तुमच्यासारखे १९६६ साली असते, तर शिवसेनेला हे दिवस पाहायला मिळाले नसते. शिवाजी महाराज, ज्ञानदेव, शाहू, फुले, आंबेडकर, अशा समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रात त्यांचे नाव घेण्याची पात्रताही या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. त्यांची ही भाषा राज्याच्या परंपरेला काळिमा फासणारी आहे, असेही राणे यांनी सांगितले.

त्यांनी मुख्यमंत्र्यांचे हे भाषण शिवसंपर्काचे नसून शिव्यासंपर्काचे होते, असे म्हटले आहे. प्रचंड जाहिरातबाजी करून घेतलेल्या या सभेला गर्दी किती आणि खर्च किती, असा सवाल करता येईल. जेमतेम ३० ते ३५ हजार लोक बसले होते. त्यातही आठ हजार फेरीवाले. ३०० रुपये देऊन आणलेले लोक…यावेळी त्यांनी केलेले भाषण पाहता यांना मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते. या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले.

त्यांनी देशात आपले कर्तृत्व दाखवले. आपली कारकीर्द गाजवली. यांचे परवाचे भाषण ऐकले आणि वाईट वाटले. १५व्या वर्षांपासून मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. बाळासाहेबांची विचारसरणी जवळून पाहिली. त्यांचे देशावरचे प्रेम, हिंदुत्वावरची आस्था, मराठीबद्दलचा अभिमान जवळून पाहिला. चांगल्याला चांगले म्हणायचे ही महाराष्ट्रातल्या संतांची शिकवण त्यांना मान्य होती आणि हे… असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, हिंदुत्व टोपीत नाही, डोक्यात असते. मग, २०१९ साली यांचे डोके कोठे गेले होते? असा सवाल नारायण राणे यांनी केला.

बाळासाहेबांनी उद्धव यांच्या आधी मला मुख्यमंत्री बनवले…

मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम करता… गेली ५०-५५ वर्षे दुकान कोणी चालवले? यशवंत जाधव आमचे नव्हते. नाहीत. त्यांच्याजवळ १०० कोटींपेक्षा जास्त रोकड मिळाली. त्यांच्याकडे इतकी तर बॉसकडे किती? हिंदुत्वाचे, शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि छापत बसायचे, हे यांचे काम असे ते म्हणाले. मला १९९१ सालापासून संरक्षण आहे. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या आधी मला मुख्यमंत्री बनवले.

दिशा सॅलियन, सुशांतला का मारले?

गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी किती जणांच्या चुली पेटवल्या हे सांगावे. तुम्ही चुली पेटवणारे नाही, तर चुली उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते, असाही टोला त्यांनी लगावला. दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह यांना ठार का मारले याचे उत्तर द्यावे, असे राणे म्हणाले.

मोदी – शहांच्या कृपेने ५६ आमदार निवडून आले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या कृपेने शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. पुढे बघा किती निवडून येतात ते. मराठी माणसाला मुंबईबाहेर, वसई-विरारला यांनीच पाठवले आणि स्वतः दोन घरे बांधली. एक कायदेशीर, एक बेकायदेशीर. पुन्हा दुसऱ्यांच्या घरांबद्दल हे तक्रार करणार. कारभार जमत नाही. कुवत नाही. मग, भाषणात फक्त शिव्या द्यायच्या हे चालले आहे, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -