Wednesday, April 23, 2025
Homeदेशसंतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

मुंबई : संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.

शिवकुमार शर्मा हे उत्तम गायकही होते. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. १९८५ मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांना बाल्टिमोर या संयुक्त राज्याचे मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आले आहे.

संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीत विश्वात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय सिनेसंगीतातही फार मोठी कामगिरी बजावली आहे. १९६७ मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम तुफान लोकप्रिय झाला होता. या अल्बममध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते.

हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जायची. या जोडीने अनेक सिनेमांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला सिनेमा होता. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या सिनेमांनाही संगीत दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -